डिझेल तुटवड्यामुळे शेतकरी आक्रमक; मुखेड-लातूर महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन!

▫️मशागतीची कामे खोळंबल्याने शेतकरी संतप्त; महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत
मुख्यालय प्रतिनिधी, मुखेड:
मान्सूनपूर्व शेती मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली असतानाच, गेल्या काही दिवसांपासून परिसरात डिझेलचा तीव्र तुटवडा जाणवत आहे. हक्काचे डिझेल वेळेवर मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज अचानक मुखेड–लातूर महामार्गावर एकत्र येत जोरदार १५ मिनिट ‘रास्ता रोको‘ आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाली होती.
सध्या तालुक्यात मान्सूनपूर्व शेती कामांची लगबग सुरू आहे. शेतकरी पेरणीपूर्व मशागत, नांगरणी आणि वखरणीच्या कामात व्यस्त आहेत. आधुनिक शेतीमध्ये ट्रॅक्टर, डिझेल पंपसेट आणि इतर स्वयंचलित शेती अवजारांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे सध्या डिझेलची मागणी प्रचंड वाढली आहे.
परंतु, स्थानिक पेट्रोलपंपांवर डिझेलचा पुरवठा सुरळीत होत नसल्याचे चित्र आहे. डिझेल मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आपला शेतीचा महत्त्वाचा वेळ सोडून तासनतास पंपावर रांगा लावाव्या लागत आहेत. एवढे करूनही डिझेल मिळेलच याची शाश्वती नसल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
आज सकाळच्या सुमारास डिझेल न मिळाल्याने हताश झालेल्या शेतकऱ्यांचा संयम सुटला आणि त्यांनीथेट मुखेड–लातूर महामार्ग अडवून धरला. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनावाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. शेतकऱ्यांच्या मागण्या समजून घेत डिझेल पुरवठा सुरळीतकरण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आणि महामार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली.
परंतु, आगामी दोन–चार दिवसांत डिझेलचा पुरवठा सुरळीत झाला नाही, तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तालुक्यातील बळीराजाने दिला आहे.
“पाऊस कधीही पडू शकतो, त्यामुळे पेरणीपूर्व मशागत वेळेत होणे गरजेचे आहे. पण डिझेलअभावी आमचे ट्रॅक्टर जागेवरच उभे आहेत. पेट्रोलपंपावर चकरा मारून आमचा दिवस वाया जात आहे. प्रशासनाने तात्काळ डिझेल पुरवठा सुरळीत करावा.”— संतप्त आंदोलनकर्ते शेतकरी



