जांब (बु.) येथे टिपू सुलतान जयंतीनिमित्त लावलेला बॅनर फाडल्याने तणाव; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड/जांब : २७ नोव्हेंबर २६
मुखेड तालुक्यातील जांब (बु.) येथे आगामी टिपू सुलतान जयंती निमित्त लावण्यात आलेला शुभेच्छा बॅनर अज्ञात कारणा वरून फाडून धार्मिक भावना दुखावल्याची घटना गुरुवारी (दि. २६ नोव्हेंबर) रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जांब (बु.) येथील टिपू सुलतान जयंती मंडळाचे सचिव शेख नूर बिलाल मुजावर (वय ३२, व्यवसाय शेती, रा. जांब बु.) यांनी या संदर्भात मुखेड पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. येत्या २९ नोव्हेंबर रोजी जांब (बु.) येथे टिपू सुलतान जयंती साजरी करण्यात येणार असल्याने मंडळाचे अध्यक्ष तुकाराम जळबा गायकवाड व सदस्यांनी २१ नोव्हेंबर रोजी गावातील तीन ठिकाणी जयंतीनिमित्त शुभेच्छा बॅनर लावले होते. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जळकोटकडे जाणाऱ्या रोडवर सोमनाथ फुलारे यांच्या दुकानाजवळ लावलेल्या बॅनरवर टिपू सुलतान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरुषांचे तसेच मंडळाच्या सदस्यांचे फोटो होते.
गुरुवारी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास फिर्यादी शेखनूर मुजावर हे दिलदार हसनसाब मुजावर, गुड्डूसाब ईमामसाब मुजावर व सुधीर बाबुराव येलपुरवाड यांच्यासह जय महाराष्ट्र हॉटेलजवळ चहा घेत थांबले होते. रात्री ९ वाजेच्या सुमारास बॅनर लावणारे दयानंद गंगाधर सोनकांबळे यांनी फोन करून सोमनाथ फुलारे यांच्या दुकाना जवळील बॅनर फाडला जात असल्याची माहिती दिली.
तक्रारदार व त्यांचे सहकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले असता, प्रशांत सिताराम मोरे आणि मुन्ना राजेंद्र शिरखडे (दोघे रा. जांब बु.) हे लाकडाने मारून बॅनर फाडताना व रस्त्यावर पाडताना दिसून आले. जाब विचारला असता त्यांनी शिवीगाळ करत धमकी दिली. या घटनेची माहिती गुड्डूसाब मुजावर यांनी तात्काळ डायल ११२ वर पोलिसांना दिली, तसेच गावातील नागरिक जमा होत असल्याचे पाहून दोन्ही आरोपी घटनास्थळा वरून निघून गेले.
धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी शेखनूर मुजावर यांच्या तक्रारीवरून प्रशांत सिताराम मोरे आणि मुन्ना राजेंद्र शिरखडे (दोघे रा. जांब बु.) यांच्याविरुद्ध मुखेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २९८, १९६(१), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.



