मुखेड शहरात छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रेने शहर दुमदुमले

मुखेड (प्रतिनिधी) ०६ जून २५
राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मुखेड शहरात अत्यंत जल्लोषात आणि अभूतपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम पालखीचे पूजन डॉ. वीरुपाक्ष शिवाचार्य महाराज, डॉ श्रीहरी बुडगेमवार, सचिन पाटील इंगोले, पंकज गायकवाड, अशोक बच्चेवार, रामदास पाटील, राजू रोडगे, गणेश पाटील बेळीकर, गजु साखरे, यांच्या हस्ते करण्यात आले असून तसेच कार्यक्रमावेळी शहरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभलेल्या या शोभायात्रेने शहरात ऐतिहासिक रंग भरले.
या शोभायात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांचा जिवंत देखावा सादर करणारे सुप्रसिद्ध मराठी अभिनेते अर्जुन अंबेकर व त्यांची पूर्ण टीम! त्यांनी महाराजांची भूमिका साकारताना केलेला अभिनय आणि त्यातील भावभावनांनी उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या सादरीकरणात संभाजी महाराजांचे शौर्य, पराक्रम आणि स्वाभिमान प्रभावीपणे साकारण्यात आले.

शोभायात्रेत विविध ऐतिहासिक आणि पारंपरिक देखावे मिरवण्यात आले. यात घोडे, उंट, पारंपरिक पालखी, शिवरायांच्या वेशातील बालकलाकार मावळे, तसेच विविध प्रकारचे सांस्कृतिक व ऐतिहासिक झांजांचे देखावे यांचा समावेश होता. संपूर्ण मुखेड शहर या दिवशी एक जणू ऐतिहासिक शिवकालीन रंगात रंगून गेले होते.
शहरातील रस्त्यांवर नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला आणि “छत्रपती संभाजी महाराज की जय” च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. अनेकांनी महाराजांच्या वेशभूषा परिधान करून इतिहास जिवंत केल्याचा अनुभव दिला.

या शोभायात्रेच्या यशस्वी आयोजनामध्ये राजमुद्रा सामाजिक संघटनेचे जंयती मडळाचे अध्यक्ष विरभद्र स्वामी चाडोळकर, कपिल काटेवाडे, सचिन चिखलीकर ,सचिव आमोल मोरे, इमाम शेख, दिपक जुने,गजु साखरे, राजमुद्रा संघटनेचे पदाधिकारी आदी शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच
स्थानिक स्वयंसेवक, महिला वर्ग, तरुणाई यांचे मोलाचे योगदान लाभले.
अशा प्रकारच्या कार्यक्रमातून तरुण पिढीमध्ये इतिहासाची जाण आणि राष्ट्रभक्तीची भावना अधिक बळकट होत असल्याचे मतही नागरिकांनी व्यक्त केले.



