मुखेड तालुक्यातील खैरका येथील युवकाचा खून

▫️उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह सोडून आरोपी पसार
मुखेड प्रतिनिधी :- श्रमिक एकता न्यूज १० जून २६
तालुक्यातील खैरका येथील एका ४५ वर्षीय व्यक्तीचा अज्ञात कारणावरून जबर मारहाण करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे. ज्ञानेश्वर नारायण श्रीरामे (वय ४५, रा. खैरका) असे मयत युवकाचे नाव असून, या घटनेमुळे मुखेड शहर व खैरका परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ज्ञानेश्वर श्रीरामे हे आज सकाळी १०.३० वाजता ज्वारी विकण्यासाठी मुखेड येथील मोंढ्यात आले होते. ते आडत दुकानावर असताना, त्यांच्याच गावातील दोन व्यक्तींनी त्यांना गाठले. मोंढ्यातच काही वेळ वाद झाल्यानंतर, हे दोन संशयित ज्ञानेश्वर यांना जबरदस्तीने मारहाण करत तेथून घेऊन गेल्याची चर्चा प्रत्यक्षदर्शीं मध्ये आहे.
दुपारी अंदाजे १:३० वाजण्याच्या सुमारास एक चारचाकी वाहन (क्रमांक: MH 24 AB 7435) मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात आले. या वाहनातून आलेल्या व्यक्तींनी गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या ज्ञानेश्वर यांना रुग्णालयात आणले आणि तिथेच सोडून घटनास्थळा वरून पोबारा केला.
रुग्णालयातील कर्तव्यावर असलेले डॉ. उमाकांत गायकवाड यांनी ज्ञानेश्वर श्रीरामे यांना तपासून तात्काळ ‘मृत’ घोषित केले.

हा घातपात पूर्ववैमनस्यातून झाला की पैशांच्या व्यवहारातून, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, मारहाण करून पळवून नेणारे आणि या गुन्ह्यातील संशयित आरोपी हे मयत ज्ञानेश्वर यांच्याच गावचे (खैरका) असल्याची जोरदार चर्चा परिसरात सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली असून, मृतदेहाचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, संशयित आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना.



