हिमायतनगर पोलिसांवर शेतकऱ्याचा गंभीर आरोप: विकत घेतलेला बैल जप्त करून गोशाळेत पाठवल्याची तक्रार

▫️तक्रार केली तर चालता–फिरता येणार नाही“, पोलिसांकडून बेदम मारहाण आणि धमकी दिल्याचा शेतकऱ्याचा लेखी आरोप; भोकर उपअधीक्षकांकडे न्यायासाठी धाव.
हिमायतनगर (प्रतिनिधी): अजीम हिंदुस्तानी १२ जून २६
शेतीकामासाठी कष्टाने खरेदी केलेला बैल पोलिसांनी ‘कत्तलीचा संशय‘ व्यक्त करत जप्त केल्याचा धक्कादायक प्रकार हिमायतनगरमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी पीडित अल्पभूधारक शेतकरी शेख जुबेर शेख रज्जाक यांनी भोकर येथील जिल्हा पोलीस उपअधीक्षकांकडे धाव घेत लेखी तक्रार दाखल केली असून, संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
नेमकी घटना काय? तक्रारदार शेख जुबेर हे अल्पभूधारक शेतकरी असून ते बटाईने शेती करतात. त्यांच्याकडे आधी पासून एक बैल होता. जोडी पूर्ण करण्यासाठी त्यांनी ६ जून २०२६ रोजी वडगाव (ज.) येथील आकाश गोविंद राठोड यांच्याकडून एक बैल खरेदी केला होता.
७ जून रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शेख जुबेर हा बैल घेऊन हिमायतनगरकडे येत असताना, नायरा पेट्रोल पंपाजवळ पोलिसांनी त्यांना अडवले. हा बैल कत्तलीसाठी नेला जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आणि त्यांना बैलासह ताब्यात घेतले.
शेख जुबेर यांनी तक्रारीत नमूद केले आहे की त्यांना पोलीस ठाण्यात आणून गैरवर्तन व मारहाण करण्यात आली.
त्यांचा बैल जप्त करून परस्पर गोशाळेत पाठवून देण्यात आला.या घटनेची कुठेही वाच्यता केल्यास किंवा तक्रार केल्यास “चालता-फिरता येणार नाही अशी अवस्था करू” अशी धमकी पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
तसेच, या प्रकरणात पैशांची मागणी झाल्याचे कोणाला सांगितल्यास पुन्हा तुरुंगात टाकण्याची भीतीही दाखवण्यात आली.
दुसऱ्या दिवशी शेख जुबेर यांची सुटका झाली असली, तरी त्यांचा बैल अद्याप गोशाळेतच आहे. पेरणीचे दिवस असताना बैल नसल्यामुळे त्यांची शेतीची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत.
“मी एक सर्वसामान्य शेतकरी असून शेतीसाठीच बैल खरेदी केला होता. बैल गोशाळेत पाठवल्यामुळे माझे आर्थिक नुकसान होत असून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे,” अशी व्यथा त्यांनी मांडली आहे.
या प्रकरणी शेख जुबेर यांनी जिल्हा पोलीस उपअधीक्षक, भोकर यांच्याकडे न्याय मागितला आहे. याप्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून, दोषींवर कारवाई करावी आणि जप्त केलेला बैल त्वरित परत मिळवून द्यावा, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. आता यावर प्रशासन काय भूमिका घेते, याकडेसर्वांचे लक्ष लागले आहे.




