बेटमोगऱ्यात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर: श्री सिद्धदयाल महाराजांनी अदा केली ईदची नमाज!

मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज २३ मार्च २०२६
संपूर्ण देशात रमजान ईदचा उत्साह असताना, मुखेड तालुक्यातील बेटमोगरा या गावाने समाजा समोर जातीय सलोख्याचे आणि हिंदू–मुस्लिम ऐक्याचे एक अनोखे उदाहरण मांडले आहे. बेटमोगरा येथील प्रसिद्ध शिवलिंग बादशाह मठ संस्थानचे प्रमुख पुजारी, परमपूज्य श्री सिद्धदयाल महाराज यांनी दरवर्षी प्रमाणे यावर्षीही ईदगाह मैदानावर जाऊन मुस्लिम बांधवां सोबत रमजान ईदची नमाज अदा केली.

बेटमोगरा गावात ही परंपरा अनेक वर्षांपासून जोपासली जात आहे. शिवलिंग बादशाह मठ हे श्रद्धास्थान केवळ हिंदूंचेच नव्हे, तर मुस्लिम बांधवांचेही तितकेच मोठे श्रद्धास्थान मानले जाते. यावर्षीही ईदच्या निमित्ताने श्री सिद्धदयाल महाराजांनी ईदगाहवर उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना गळाभेट घेत शुभेच्छादिल्या. केवळ शुभेच्छाच न देता, त्यांनी नमाजच्या प्रक्रियेत सहभाग घेऊन “ईश्वर आणि अल्लाह एकच आहेत” हा संदेश आपल्या कृतीतून दिला.
“दुःख अडवायला, उंबऱ्या सारखा… मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा“ या ओळींची प्रचिती आज या सोहळ्यात आली. जेव्हा समाजात भेदाभेद वाढताना दिसतो, तेव्हा महाराजांनी घेतलेला हा पुढाकार वणव्या मध्ये गारव्या सारखा सुखद देणारा आहे.
या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे, बेटमोगरा गावातील संपूर्ण समाज एकत्रित येऊन बॅंड लावून महाराजांनावाजत–गाजत गावातून ईदगाह मैदानापर्यंत घेऊन जातो. यावेळी मुस्लीम बांधवांनी महाराजांचे जंगीस्वागत केले.
“आमच्या गावात हिंदू-मुस्लिम असा कोणताही भेदभाव नाही. महाराज दरवर्षी रमजान आणि बकरी ईदमध्ये उत्साहाने सामील होतात, ही आमच्यासाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे,” अशा भावना डॉ. फारुख शेख व स्थानिक नागरिकांनी व्यक्त केल्या.
या प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक, तरुण आणि मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. बेटमोगऱ्याच्या या पवित्र परंपरेचे आज संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे.



