सामाजिक

हिमायतनगरच्या नवनियुक्त पोलीस निरीक्षकांकडून नागरिकांच्या ‘मोठ्या’ अपेक्षा!


हिमायतनगर प्रतिनिधी श्रमिक एकता न्यूज़:- अजीम हिंदुस्तानी ०४ जून २६

हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदाची सूत्रे हाती घेतलेल्या नवनियुक्त पोलीस निरीक्ष लक्ष्मण केंद्रे यांच्या कडून शहरातील शांतताप्रिय नागरिकांच्या अपेक्षा कमालीच्या वाढल्या आहेत. कायद्याचे काटेकोर पालन करत शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, सामाजिक सलोखा टिकवणे आणि सर्वसामान्य नागरिकांना विनाविलंब न्याय मिळवून देणे, हे नवनियुक्त अधिकाऱ्यांसमोर मुख्य आव्हान असणार आहे.

हिमायतनगर हे संमिश्र लोकवस्तीचे आणि विविध समाजघटकांचे शहर असून येथे सर्व धर्मीय नागरिक गुण्यागोविंदाने राहतात. अशा संवेदनशील आणि बहुसांस्कृतिक शहरात पोलीस प्रशासनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. त्यामुळे नवनियुक्त पोलीस निरीक्षकांनी सर्व स्तरातील नागरिकांशी थेट सुसंवाद साधून, त्यांच्या समस्या समजून घ्याव्यात आणि पोलीस दलाविषयी सर्वसामान्यांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

कोणत्याही जाती, धर्माचा किंवा गरीब-श्रीमंत असा भेदभाव न करता, तक्रार घेऊन येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला पोलीस ठाण्यात सन्मानाची वागणूक मिळावी. त्याचे म्हणणे संयमाने ऐकून घेऊन निपक्षपातीपणे न्याय दिला जावा, अशी रास्त अपेक्षा हिमायतनगरवासीयांकडून व्यक्त होत आहे. ‘पोलीस ठाणे हे सर्वसामान्यांसाठी हक्काचे आणि न्यायाचे ठिकाण आहे’, हा विश्वास प्रशासनाने आपल्या कृतीतून दाखवून देणे गरजेचे आहे.

शहरात पाय पसरणारे विविध अवैध धंदे, बेकायदेशीर व्यवसाय, वाढती गुन्हेगारी प्रवृत्ती आणि समाजविघातक कृत्ये मोडीत काढण्यासाठी नव्या पोलीस प्रमुखांना विशेष मोहीम राबवावी लागणार आहे. कायद्याचे राज्य अधिक मजबूत करण्यासाठी कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक दबावाला बळी न पडता, गुन्हेगारांवर कठोर आणि दंडात्मक कारवाई करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे.

नवनियुक्त पोलीस लक्ष्मण केंद्रे यांनी कायदा व सुव्यवस्था, सामाजिक शांतता, जनतेशी सुसंवाद आणि गुन्हेगारीवर कडक नियंत्रण ठेवून एक आदर्श कारकीर्द घडवावी, अशी अपेक्षा आज घडीला व्यक्त होत आहे. आता येणाऱ्या काळात नव्या अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीतून या जनअपेक्षा कितपत पूर्ण होतात, याकडे संपूर्ण हिमायतनगर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button