लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई: मुखेडच्या हुतात्मा माधव विद्यालयाचा मुख्याध्यापक ५० हजारांच्या लाचेसह नांदेडमध्ये ताब्यात!

मुखेड प्रतिनिधी : श्रमिक एकता न्यूज़ ०४ जून २६
शालेय खर्चाचा हप्ता, बदली करून देणे आणि नोटीस न बजावण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या मुख्याध्यापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. राजेश गोविंदराव पडलवार (वय ५१, वर्ग-ब) असे लाचखोर मुख्याध्यापकाचे नाव असून, या धडक कारवाईमुळे शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.
नेमके काय आहे प्रकरण आरोपी राजेश पडलवार हा मुखेड येथील ‘हुतात्मा माधव विद्यालय’ येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. याच विद्यालयात लिपिक पदावर कार्यरत असलेल्या ३८ वर्षीय तक्रारदाराकडे त्याने लाचेची मागणी केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, विद्यालयाच्या शालेय खर्चाच्या नावाखाली प्रतिमहिना १२,००0 रुपये प्रमाणे जानेवारी ते मे २०२६ या पाच महिन्यांचे हप्ते, तसेच तक्रारदाराची बदली करून देणे आणि त्यांना नोटीस न देण्यासाठी मुख्याध्यापकाने तब्बल ६०,००० रुपयांची लाच मागितली होती. या जाचाला कंटाळून लिपिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अधिकृत तक्रार नोंदवली.
तक्रारीच्या आधारे दि. ३ जून २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शासकीय पंचांसमक्ष पडताळणी केली. तक्रारदाराने मुख्याध्यापकाला कॉल केला असता, त्याने त्यांना शारदानगर, नांदेड येथील आपल्या निवासस्थानी बोलावून घेतले. तिथे शासकीय पंचांसमक्ष मुख्याध्यापक पडलवार याने ६० हजारांच्या लाचेची मागणी करत तडजोडीअंती ५०,००० रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. तसेच “आता यापुढे तुला हप्ता देण्याची गरज नाही, यातच तुझी बदली करून घेतो,” असे आश्वासनही दिले.
लाचेची रक्कम स्वीकारण्याचे ठरल्यानंतर, एसीबीच्या पथकाने शारदानगर येथील मुख्याध्यापकाच्या घरी सापळा रचला. तक्रारदाराकडून ५०,००० रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना मुख्याध्यापक राजेश पडलवार याला पथकाने रंगेहात पकडले.
आरोपीच्या अंगझडतीमध्ये एक विवो कंपनीचा मोबाईल, पिवळ्या धातूची अंगठी, ओळखपत्रे आणि ५,५०० रुपयांची रोख रक्कम मिळून आली आहे.
सध्या आरोपीच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू असून, विमानतळ पोलीस ठाणे, जि. नांदेड येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम वेगाने सुरू आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, गुन्हा नोंद झाल्यानंतर त्याला रीतसर अटक करण्यात येईल.
हि धडक कारवाई ला.प्र.वि. नांदेडच्या पोलीस निरीक्षक माधुरी यावलीकर (सापळा अधिकारी) यांनी केली. या कारवाईसाठी ला.प्र.वि. नांदेडचे पोलीस उप अधीक्षक श्री. प्रशांत पवार यांचे मार्गदर्शन लाभले, तर या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रीती जाधव करत आहेत.



