माझ्या लेकाला वाचवा!’ म्हणत ६४ वर्षांच्या आईने दिली स्वतःची किडनी

▫️या माऊलीने दाखवलेल्या हिमतीला, त्यागाला आणि ममतेला आज सर्वत्र सलाम केला जात आहे.
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड:- २९ जून २६
जगात आईची माया सर्वात श्रेष्ठ मानली जाते. या मातृत्वाची आणि अथांग प्रेमाची प्रचिती मुखेड तालुक्यातील मौजे डोरनाळी येथे पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. एका ६४ वर्षीय माऊलीने मृत्यूच्या दाढेत असलेल्या आपल्या ३० वर्षीय मुलाला स्वतःची किडनी दान करून अक्षरशः पुनर्जन्म दिला आहे. कमलबाई रामकांत शिंदे असे या धाडसी आणि प्रेमळ मातेचे नाव आहे.
मुक्रमाबाद सेवा सहकारी सोसायटीचे माजी संचालक रमाकांत पा. शिंदे यांचा मुलगा उमेश (वय ३०) याची प्रकृती काही दिवसां पासून बरी नव्हती त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, वैद्यकीय तपासणी अंती उमेशच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले. यामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
मुलाच्या आजाराची ही धक्कादायक बातमी जेव्हा ६४ वर्षीय आई कमलबाई यांना समजली, तेव्हा त्यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता, क्षणाचाही विलंब न लावता स्वतःची किडनी मुलाला देण्याचा धाडसी निर्णय घेतला.
२७ जून २०२६ रोजी नांदेड येथील एका रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. मैदपवाड आणि डॉ. राठोड यांच्या वैद्यकीय पथकाने ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली व उमेशला जीवदान मिळाले.
‘सात जन्मही उपकार फेडू शकणार नाही’ आईने दिलेल्या या अमूल्य भेटीमुळे उमेशला मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. “आईने मला किडनी देऊन दुसरा जन्म दिला आहे, तिचे हेउपकार मी सात जन्मही फेडू शकणार नाही,” अशी अत्यंत भावनिक प्रतिक्रिया उमेशने व्यक्त केली.
कमलबाई या प्रा. शैलेश शिंदे (डोरनाळीकर) यांच्या मातोश्री आहेत. आईच्या या अथांग प्रेमाचे, हिमतीचे आणि त्यागाचे संपूर्ण तालुक्यातून कौतुक होत असून, या माऊलीच्या ममतेला सर्वत्र सलाम केला जातआहे.



