प्रशासनाला पैशाची मस्ती की नियमांची ॲलर्जी? विद्यार्थ्यांच्या मार्गावरच वाईन शॉपला ग्रीन सिग्नल!

▫️बाराहाळी नाक्यासारख्या संवेदनशील मार्गावर वाईन शॉपला नियमबाह्य ‘NOC’ दिलीच कशी? तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय
श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड :- १३ ऑगस्ट २६
मुखेड शहरात आधीच बारची संख्या मोठी असताना, आता शहरातील अत्यंत वर्दळीच्या आणि संवेदनशील मानल्या जाणाऱ्या ‘बाराहाळी नाका‘ परिसरात नवीन वाईन शॉप सुरू करण्याचा घाटघातला जात आहे. विशेष म्हणजे, शाळा, रुग्णालये आणि विद्यार्थ्यांची मोठी रेलचेल असलेल्या यामार्गावर वाईन शॉप थाटण्यासाठी मुखेड नगर परिषदेने चक्क ‘ना–हरकत प्रमाणपत्र‘ (NOC) दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रशासनाच्या या बेजबाबदार कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, संतप्त नागरिकांनी या निर्णया विरोधात उग्र आंदोलन छेडण्याचा थेट इशारा दिला आहे.
बाराहाळी नाका हा मुखेड शहरातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि कायम गजबजलेला मार्ग आहे. याच रस्त्यावर अनेक शाळा, रुग्णालये, खाजगी क्लासेस आणि संगणक प्रशिक्षण केंद्रे आहेत. त्यामुळे दिवसभर या भागात शाळकरी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची मोठी वर्दळ असते. अशा शैक्षणिक आणि वैद्यकीयदृष्ट्या संवेदनशील परिसरात मद्याचे दुकान सुरू झाल्यास, परिसरातील शांतता भंग पावेल आणि शाळकरी मुलांच्या तसेच तरुणांच्या मानसिकतेवर त्याचा गंभीर परिणाम होईल, अशी रास्त भीती पालकांकडून व्यक्त केली जात आहे.
शासकीय नियमांनुसार, शैक्षणिक संस्था, मंदिरे आणि रुग्णालयांच्या ठराविक अंतरावर मद्यविक्रीची दुकाने थाटण्यास सक्त मनाई आहे. असे असतानाही नगर परिषद प्रशासनाने या सर्व नियमांना केराचीटोपली दाखवत या वाईन शॉपला ‘एनओसी‘ कशी दिली? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तत्कालीन मुख्याधिकारी नीलम कांबळे यांच्या कार्यकाळात हे ना–हरकतप्रमाणपत्र देण्यात आल्याची चर्चा शहरात आहे. त्यामुळे या संपूर्ण परवानगी प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच आता दाट संशय व्यक्त केला जात आहे.
“प्रशासनाने वाईन शॉपला परवानगी देताना परिसराचे स्वरूप, विद्यार्थ्यांची ये–जा आणि नागरिकांची सुरक्षितता याचा गांभीर्याने विचार करणे अपेक्षित होते. जर नियमांची पायमल्ली करून बळजबरीने याठिकाणी वाईन शॉप सुरू करण्याचा प्रयत्न झाला, तर मुखेडचे नागरिक मुकाट्याने सहन करणार नाहीत. प्रशासनाने तातडीने या विषयाची दखल घेऊन दिलेली परवानगी रद्द करावी आणि हा प्रस्ताव फेटाळावा, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल,” अशी आक्रमक भूमिका परिसरातील नागरिकांनी घेतली आहे.
शहरातील सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या या वाईन शॉपच्या प्रस्तावावर आता विद्यमान प्रशासन कायकारवाई करणार? याकडे संपूर्ण मुखेडकरांचे लक्ष लागून आहे.



