सैनिक रत्न पुरस्काराने सन्मानित माजी सैनिकांचा राजे छत्रपती अकॅडमी येथे भव्य सत्कार

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड:- १४ ऑगस्ट २६
भारतीय सैन्याच्या शौर्याचा व पराक्रमाचा गौरव करणारा कारगिल विजय दिवस दरवर्षी 26 जुलै रोजी साजरा केला जातो. यंदा मुंबई येथे सैनिक फेडरेशनच्या वतीने मा. खासदार तथा सेवानिवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात राज्यभरातील माजी सैनिक व शहीद परिवारांचा सन्मान करण्यात आला.
देशाच्या संरक्षणासाठी आपल्या जीवाचे बलिदान देणाऱ्या शहीद परिवारांचा तसेच आपल्या आयुष्याचा मोठा काळ समर्पित करणाऱ्या माजी सैनिकांना सैनिक फेडरेशनच्या वतीने मा. खासदार तथा ब्रिगेडियर सुधिर सावंत तसेच जनरल सेक्रेटरी डी.एफ. निंबाळकर व नांदेड जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील डुमणे व अनेक प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सैनिक रत्न हा मानाचा पुरस्कार प्रधान करण्यात आला.
या पुरस्कारात नांदेड जिल्ह्यातील तीन माजी सैनिकांचा समावेश आहे
त्यामध्ये मुदखेड नगरीचे मा. उपनगराध्यक्ष तथा सैनिक फेडरेशनचे मराठवाडा अध्यक्ष लक्ष्मण देवदे तसेच भारतीय माजी सैनिक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष ऑनररी कॅप्टन प्रकाश कस्तुरे तसेच कारगिल युद्धात ज्यांना स्वतःचा डावा पाय गमवावा लागला ऑनररी कॅप्टन दत्ता पोतगंते या मान्यवरांना सैनिकरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. देशाच्या संरक्षणाबरोबरच सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी करत असलेल्या कार्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्काराबद्दल नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक सैनिकांसाठी अभिमानाचा क्षण आहे. या कार्यातून देशभक्ती कर्तव्यनिष्ठा आणि सेवाभावाची प्रेरणा प्रत्येक युवा पिढीला मिळत रहावो असे वक्तव्य मुखेड येथील राजे छत्रपती अकॅडमी मध्ये सत्कारादरम्यान सैनिक फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष तथा राजे छत्रपती अकॅडमीचे प्रमुख ज्ञानेश्वर डुमणे यांनी केले.
या राष्ट्रीय पुरस्कारासाठी जिल्ह्यातील सामाजिक तथा राजकीय क्षेत्रातून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे. पुरस्कार प्राप्त तिन्ही सैनिक बांधवांनी “देशसेवा ही सर्वोच्च सेवा” सांगत असताना अकॅडमीतील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. लक्ष्मण देवदे यांनी बोलत असताना म्हटले “देश सेवा ही केवळ सैन्यातच नसते, तर समाजसेवेतूनही ती तितक्याच निस्वार्थ भावनेने करता येते” जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील डुमणे यांच्या शिफारशीने आम्हाला सैनिक रत्न पुरस्कार मिळाला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. तसेच ग्रामीण भागातील राजे छत्रपती अकॅडमी म्हणजे अगदी माफक फीस मध्ये महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना घडवणारी सैन्य व पोलीस भरतीची फॅक्टरी आहे आणि विशेष म्हणजे डुमणे पाटलांची विद्यार्थ्यांच्या पाठीशी प्रमाणिक मेहनत आम्ही जवळून ओळखतो तसेच प्रशिक्षण केंद्र चालवत जिल्ह्यातील आजी माजी सैनिकांच्या अडचणीसाठी एका हाकेला धावून जातात ही बाब आम्हा सर्व सैनिकांसाठी अभिमानाची आहे असे वक्तव्य लक्ष्मण देवदे यानी विद्यार्थ्यांसमोर मार्गदर्शन करत असताना केले.



