मुखेड शहरात शादीखान्यासाठी शासकीय जागा उपलब्ध करून द्या!

◽️जागेअभावी निधी परत जाण्याची खंत; राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद सामाजिक संघटनेची मुख्याधिकारीकडे निवेदनाद्वारे मागणी
श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड: १४ ऑगस्ट २६
मुखेड शहरात मुस्लिम समाजाची लोकसंख्या लक्षणीय असूनही गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या मंगल कार्यासाठी हक्काचा ‘शादीखाना‘ उपलब्ध नाही. शादीखान्याच्या बांधकामासाठी यापूर्वी आलेला प्रशासकीय निधी जागे अभावी परत गेला आहे. ही अडचण दूर करण्यासाठी शहरात उपलब्ध असलेल्या शासकीय जागेवर शादीखान्यासाठी जागा आरक्षित करून त्वरित ना–हरकत दाखला द्यावा, अशी मागणी राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद सामाजिक संघटनेची निवेदनाद्वारे मुखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरण डाके यांच्याकडे करण्यात आली आहे.
निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, मुस्लिम समाजातील गोरगरीब कुटुंबांना विवाह व इतर सामाजिक कार्यक्रमांसाठी मोठ्या आर्थिक आणि व्यावहारिक अडचणींचा सामना करावा लागतो. लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातून यापूर्वी अनेकदा शादीखाना बांधकामासाठी प्रशासकीय निधी मंजूर झाला होता. मात्र, योग्य शासकीय जागा उपलब्ध न झाल्यामुळे तो निधी वारंवार परत गेला. निधी उपलब्ध असूनही जागेअभावी काम न होणे, ही संपूर्ण मुखेड शहरासाठी आणि मुस्लिम समाजासाठी अत्यंत खेदजनक बाब असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी शहरात दोन मध्यवर्ती ठिकाणी शासकीय मोकळ्या जागा उपलब्ध आहेत, जिथेहे बांधकाम सहज शक्य आहे: १. जुनी नगरपालिका स्मारकाच्या पाठीमागील मोकळी जागा. २. क्रीडासंकुल परिसरातील शासकीय मोकळी जागा यापैकी कोणत्याही एका जागेची प्रशासनाने तात्काळ पाहणी करावी आणि शादीखान्यासाठी जागा आरक्षित करून मंजुरी प्रदान करावी, जेणेकरून परत जाणाऱ्या निधीचा योग्य वापर होऊन गोरगरीब नागरिकांची मोठी सोय होईल, अशी विनंती प्रशासनाला करण्यात आली आहे.
या निवेदनाची प्रत मुखेडचे नगराध्यक्ष यांनाही देण्यात आली असून प्रशासनाने या संवेदनशील विषयावर गांभीर्याने विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सदर निवेदनावर राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद जिल्हा अध्यक्ष पत्रकार शेख महेताब, तालुका अध्यक्ष भाई आसद बल्खी, पत्रकार बबलु मुल्ला, पत्रकार संजय कांबळे, आयुब हानुसाब पठाण, शबीर बल्खी, मेराज शेख, खदीर शेख, ईलियास कादरी, गौस कुरेशी, खदीर भाई शेख, अमीर कुरेशी, गौस पठाण अनेक सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



