प्रवाशांच्या सोयीसाठी मुखेड बसस्थानकात ‘सुप्रभात मित्र मंडळा’कडून सिमेंटच्या बाकांचे लोकार्पण

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड:०५ सप्टेंबर २६
प्रवाशांची, विशेषतः वृद्ध, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय दूर व्हावी या उद्देशाने ‘सुप्रभात मित्र मंडळ, मुखेड’च्या वतीने बसस्थानक परिसरात सिमेंटचे बाक बसवण्यात आले आहेत. मंडळाचे कार्याध्यक्ष अशोक कोत्तावार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राबविण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाचा लोकार्पण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. मुखेड आगाराचे आगारप्रमुख सुभाषराव पवार आणि मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण पत्तेवार यांच्या हस्ते श्रीफळ फोडून या बाकांचे लोकार्पण करण्यात आले; तसेच यावेळी एका प्रवाशाचा प्रातिनिधिक सन्मान करून प्रवाशांप्रती आदर व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा ‘मुखेड भूषण’ डॉ. दिलीपराव पुंडे यांनी आपल्या मनोगतात एसटीचे बदलते रूप आणि सुरक्षित प्रवासाचे महत्त्व अधोरेखित केले. एसटी कर्मचाऱ्यांनी निरोगी, निर्व्यसनी आणि शिस्तप्रिय राहून प्रवाशांची सेवा करावी, असे आवाहन त्यांनी केले. आगारप्रमुख सुभाषराव पवार यांनी मंडळाच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत प्रवाशांना वेळेत व सुरक्षित सेवा देण्याची ग्वाही दिली. याप्रसंगी सचिव जीवन कवटीकवार, संघटक उत्तम कुलकर्णी, डॉ. एम. जे. इंगोले, डॉ. आर. जी. स्वामी, नारायणराव बिलोलीकर, नंदकुमार मडगुलवार यांच्यासह मंडळाचे इतर पदाधिकारी, एसटी कर्मचारी आणि प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादाराव आगलावे यांनी, तर आभार प्रदर्शन जीवन कवटीकवार यांनी केले. शेवटी बालाजी वट्टमवार यांच्या वतीने प्रवाशांना केळी वाटप करून या सोहळ्याची सांगता करण्यात आली.



