उद्घाटनापूर्वीच मुखेडच्या शासकीय विश्रामगृह इमारतीच्या भिंतींना मोठ्या भेगा

▫️निकृष्ट बांधकामाचे पितळ उघडे; भिंतींना पडल्या मोठ्या भेगा, कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड:- ०५ सप्टेंबर २६
मुखेड येथील शासकीय विश्रामगृहाच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी, उद्घाटनाची प्रतीक्षा करत असलेल्या या वास्तूला आत्ता पासूनच मोठ्या भेगा पडू लागल्या आहेत.

आतमध्ये काही किरकोळ कामे बाकी असल्याने अद्याप या इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडलेला नाही;मात्र त्याआधीच या नव्याकोऱ्या बांधकामाचे पितळ उघडे पडले आहे. इमारतीच्या बाह्य भिंतींना मोठे आणि खोल तडे गेल्याचे स्पष्ट दिसत असून, आकर्षक पिवळा रंग देऊन दोष लपवण्याचा प्रयत्न झाला असला तरी, तळापासून ते वरपर्यंत पडलेल्या लांबच लांब भेगा या निकृष्ट कामाची साक्ष देत आहेत.

शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीतून उभारल्या जाणाऱ्या या विश्रामगृहात अत्यंत सुमार दर्जाचे साहित्य वापरले गेल्याचा संशय यामुळे निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यातील साटेलोट्यामुळेच या निकृष्ट कामाकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात असल्याचा आरोप होत आहे. उद्घाटनाच्या अगोदरच जर इमारतीला अशा प्रकारे तडे जात असतील, तर भविष्यात ही वास्तू सुरक्षित राहील का, हा मोठा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

संबंधित प्रशासनानेतत्काळ या संपूर्ण बांधकामाचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट‘ करावे आणि दोषी कंत्राटदारासह दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता जनतेतून होत असून या प्रकरणाची सखोल चौकशी न झाल्यास स्थानिक पातळीवर तीव्र रोष निर्माण होण्याची शक्यता आहे.





