तांदळी येथे युवकाचा रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह; बिबट्याच्या हल्याचा संशय

मुखेड प्रतिनिधी :- दि १७ सप्टेंबर
मुखेड तालुक्यातील तांदळी येथील जनार्दन उत्तम जाधव (वय ३०) यांचा संशयास्पद मृतदेह शेतातीलशेडच्या पत्रावर आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गळा फोडलेला व शरीरावर बोखरल्याचे जखमा असल्याने हा मृत्यू बिबट्याच्या हल्यामुळे झाल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जनार्दन जाधव काही दिवसांपूर्वी पुणे शहरातून गावी आले होते. दि. १५ सप्टेंबर रोजी त्यांनी मुखेड येथे जाऊन भाजीपाला खरेदी केली व सायंकाळी नेहमीप्रमाणे शेतातील पत्र्याच्या झोपडीत झोपण्यासाठी गेले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी दि. १६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी त्यांचा रक्तबंबाळ मृतदेह झोपडीच्या पत्रावर आढळून आला. ही घटना समजताच गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक लक्ष्मणराव केंद्रे व पोलीस उपनिरीक्षक संदीप यमावार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मात्र, परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने पोलिसांना तपास कार्य अडचणीने करावे लागले.
या घटनेमुळे तांदळी व परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण असून वनविभागाने तातडीने तपासकरून बिबट्याच्या उपस्थितीची खात्री करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. दरम्यान, मृत्यूचे नेमकेकारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार आहे.



