नांदेड पुन्हा रक्ताळले! पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तरुणावर थरारक गोळीबार; शहरात प्रचंड खळबळ

नांदेड (विशेष प्रतिनिधी) : श्रमिक एकता न्यूज़ २१ जून २६
शहरातील कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून गुन्हेगारांना पोलिसांचा कसलाही धाक उरलेला नाही, हे सिद्ध करणारी आणखी एक थरारक आणि अत्यंत दुर्दैवी घटना नांदेड मध्ये घडली आहे. खडकपुरा भागातील रहिवासी शेख शमीम शेख इसाक (वय ४२) यांची अज्ञात हल्लेखोरांनी मध्यरात्री अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण नांदेड शहर पुन्हा एकदा हादरले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, २१ जूनच्या मध्यरात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास शेख शमीम हे त्यांच्या एका मित्रासोबत वाघी रस्त्यावरील एका पान टपरी जवळील ओट्यावर बसले होते. शांतता असताना अचानक काही दुचाकींवरून अज्ञात हल्लेखोर तिथे आले. त्यांनी अत्यंत थंड डोक्याने शेख शमीम यांना जवळच्या दर्ग्याचा पत्ता विचारला शेख शमीम हल्लेखोरांना पत्ता समजावून सांगत होते. याच दरम्यान त्यांच्या सोबत असलेल्या मित्राला हल्लेखोरांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या आणि त्याच्या नजरेला हल्लेखोरा जवळील पिस्तूल पडले. मित्राने शमीम यांना सावध करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. हल्लेखोरांनी काही समजण्याच्या आतच शमीम यांच्यावर थेट गोळीबार केला.
हल्लेखोर एवढ्यावरच थांबले नाहीत. गोळीबार केल्यानंतर त्यांनी सोबत आणलेल्या धारदार शस्त्रांनी शेख शमीम यांच्यावर सपासप वार केले. या भीषण आणि जीवघेण्या हल्ल्यात शमीम यांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या आणि ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. हल्ला केल्यानंतर आरोपी दुचाकीवरून अंधाराचा फायदा घेत पसार झाले.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शमीम यांना त्यांच्या मित्राने आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र शरीरातून प्रचंड रक्तस्त्राव झाल्यामुळे सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
कोणताही वाद किंवा मतभेद असले तरी कायदा हातात घेऊन थेट मध्यरात्री भर चौकात एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल जातेच कशी? असा संतप्त सवाल आता नांदेड पॅटर्नवर उपस्थित केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेतली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर धागेदोरे तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पत्ताविचारण्याच्या बहाण्याने झालेली ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाली की यामागे काही वेगळे कारण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे मोठे आव्हान आता नांदेड पोलिसां समोर आहे.



