मविआच्या ‘त्या’ निर्णयामुळे कार्यकर्ते संतप्त, बंडाची ठिणगी मतपेटीतून उमटणार?

▫️१२५ मतं असलेल्या काँग्रेसला डावलून अवघ्या १३ मतांच्या शिवसेना उबाठा ला झुकते माप; कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप.
▫️सव्वाशे मतं असलेल्या काँग्रेस उमेदवाराला ऐनवेळी माघार घेण्याचे आदेश!
नांदेड प्रतिनिधी :- श्रमिक एकता न्यूज़ ७ जून २६
नांदेड विधान परिषद द्विवार्षिक निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीत मोठी बिघाडी झाल्याचे चित्र समोर येत आहे. ऐनवेळी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराला माघार घ्यायला लावल्याने नांदेड काँग्रेसच्या गोटात प्रचंड असंतोष निर्माण झाला असून, कार्यकर्त्यां मधील हा राग आता थेट बंडाच्या पवित्र्यात बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या राजकीय घडामोडींमुळे स्थानिक पातळीवर मविआ मध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे उघड झाले आहे.
नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात काँग्रेसकडे तब्बल सव्वाशे (१२५) हून अधिक मतदारांचे भक्कम संख्याबळ आहे. असे असतानाही ऐनवेळी वरिष्ठ पातळीवरून काँग्रेस उमेदवाराचा पत्ता कट करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या शिवसेना पक्षाकडे अवघी १३ मते आहेत, त्यांच्या उमेदवाराला महाविकास आघाडीने पुरस्कृत केले आहे. या अजब आणि अन्यायकारक राजकीय तडजोडीमुळे काँग्रेसचे स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
“ज्या पक्षाची ताकद जिल्ह्यात सर्वात मोठी आहे, त्यालाच शरणागती पत्करावी लागली,” अशा भावना काँग्रेस कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहेत. ‘आयत्या वेळी‘ उमेदवारी मागे घ्यायला लावल्याने पक्षाच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. वरिष्ठांच्या या ‘एकतर्फी‘ निर्णयामुळे कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचले असून, प्रचारातही निरुत्साह दिसून येत आहे.
नांदेड हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला राहिला आहे. अशा परिस्थितीत आपल्याच हक्काच्या जागेवर दुसऱ्या पक्षाचा उमेदवार लादल्याने काँग्रेस अंतर्गत छुपा कलह उफाळून आला आहे. हा अंतर्गत असंतोष केवळ चर्चेपुरता मर्यादित नसून, याचे थेट आणि गंभीर पडसाद आगामी मतपेटीतून उमटण्याची दाटशक्यता नाकारता येत नाही. काँग्रेसच्या या नाराजीचा फायदा थेट विरोधकांना होणार की महाविकास आघाडीला क्रॉस व्होटिंगचा फटका बसणार? याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



