कंधार आगाराचा भोंगळ कारभार: वेळापत्रक केवळ नावापुरतेच! सायंकाळी नांदेड शटल सेवेचा बोजवारा; प्रवाशांचा संताप

श्रमिक एकता न्यूज नेटवर्क कंधार :- ०६ ऑक्टोंबर २६
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कंधार आगाराचा भोंगळ व नियोजनशून्य कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आगाराने बसस्थानकावर नांदेड शटल सेवेचे भव्य वेळापत्रक लावून प्रवाशांना वेळेचे आमिष दाखवले असले, तरी प्रत्यक्षात मात्र सायंकाळच्या वेळेत गाड्या वेळेवर न सोडल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले आहेत. सायंकाळी ६:०० वाजल्यापासून ताटकळणाऱ्या प्रवाशांना तब्बल दीड तास एकाही गाडीचा पत्ता नव्हता, तर थेट ७:३० वाजता बस फलाटावर लागल्यानेसंतप्त प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

कंधार आगाराच्या अधिकृत वेळापत्रकानुसार सायंकाळी १८:०० (६:००), १९:०० (७:००), १९:१५ (७:१५), २०:०० (८:००) अशा लागोपाठ नांदेड शटल फेऱ्या नियोजित आहेत. मात्र, सायंकाळी ६:०० वाजता सुटणारी बस वेळेवर उपलब्ध झाली नाही. त्यानंतर ७:०० आणि ७:१५ ची फेरीही गायबच राहिली. सायंकाळी ६:०० वाजल्यापासून ताटकळत उभ्या असलेल्या प्रवाशांना अखेर ७:३० वाजता गाडी मिळाल्याने तब्बल दीड तासाहून अधिक काळ स्थानकावर तिष्ठत बसावे लागले. यामुळे पुढची ८:०० वाजताची नियोजित फेरीही कोलमडली.

सायंकाळच्या सुमारास कंधारहून नांदेडकडे जाणाऱ्यांमध्ये शासकीय व खासगी नोकरदार, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला आणि रुग्णांची संख्या मोठी असते. भरतीच्या वेळीच गाड्या रद्द किंवा विलंबाने धावत असल्याने बसस्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली होती. “वेळापत्रकात दर १५ ते२० मिनिटांना फेऱ्या दाखवून प्रवाशांची दिशाभूल केली जात आहे. प्रत्यक्षात मात्र गाड्यांचे कोणतेही नियोजन नाही,” असा संतप्त सवाल उपस्थित प्रवाशांनी केला.
स्थानकावर अधिकृत फलक लावून जर गाड्या वेळेवर सोडल्या जात नसतील, तर अशा वेळापत्रकाचा उपयोग काय? असा संतप्त प्रश्न प्रवासी विचारत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ढिसाळ कारभाराची तातडीने दखल घेऊन कंधार–नांदेड शटल सेवा वेळापत्रकानुसार नियमित करावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.



