सामाजिक

सरकारी अनुदान गैरव्यवहारप्रकरणी दोषींवर कारवाई करा :- बच्चेवार यांची मागणी

मुखेड -(ता. प्रतिनिधी) २८ जून २५

तालुक्यातील बेरळी खुर्द येथील शेतजमिनीत अनधिकृत भूखंडीकरण आणि खोटा पेरा दाखवून शासनाच्या दुष्काळी अनुदानात फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी आदेश दिल्यानंतरही गुन्हा नोंद न करणाऱ्या तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी होत आहे.
मुखेड येथील अशोक मारोती बच्चेवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मौजे बेरळी खुर्द येथील सर्वे नं. १३५ मधील २ हेक्टर क्षेत्रात शासनाची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता तब्बल ११७ भूखंड पाडले गेले. या जमिनीवर कोणत्याही पिकांची लागवड न करता खोटे पिक पेरल्याचे दाखवून २०१६ आणि २०१८ साली दुष्काळी अनुदानाचा लाभ घेतल्याचा आरोप आहे.
तक्रार मिळाल्यानंतर संबंधित तलाठी जाधव यांना गुन्हा नोंदविण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्यांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे स्पष्ट असून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी बच्चेवार यांनी केली आहे.
त्याचप्रमाणे, मंडळ अधिकारी यांनीही याप्रकरणात कोणतीही ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे त्यांनीही आपली जबाबदारी पार पाडली नसल्याचे दिसते. तक्रारदाराने या अधिकाऱ्यांवर भारतीय दंड विधानातील कलम १६६, २१७, २१८ अंतर्गत फौजदारी गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे.
जर प्रशासनाकडून याप्रकरणी योग्य ती कार्यवाही झाली नाही, तर मला न्यायालयात जाण्याची वेळ येईल. तसेच कायद्यानुसार कलम १९७ अंतर्गत अधिकाऱ्यांवर खटला दाखल करण्यासाठी आवश्यक परवानगी द्यावी, अशी मागणी तक्रारदार अशोक बच्चेवार यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button