क्राईम

धनादेश अनादरप्रकरणी एक वर्षाची शिक्षा; ६ लाखांची भरपाई करण्याचे न्यायालयाचे आदेश

मुखेड प्रतिनिधी:- २७ जून २५

पतीच्या पेन्शनमधून दिलेले ५ लाख रुपये परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी मुखेड न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत आरोपी रोहिणी कांबळे यांना एक वर्षाच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच फिर्यादी पक्षास ६ लाख रुपये भरपाई देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. सदर रक्कम एका महिन्यात भरली नाही, तर आणखी तीन महिन्यांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागणार असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
शीलबाई बाबूलाल बेदरकर (रा. मुखेड) यांनी आपल्या पतीच्या पेन्शनमधून रोहिणी कांबळे यांना ५ लाख रुपये हातउसने दिले होते. यासाठी भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँक शाखेचा धनादेश कांबळे यांनी दिला होता. मात्र, बँकेत तो धनादेश वटला नाही. कारण कांबळे यांनी स्वतःच बँकेला लेखी अर्ज करून संबंधित रक्कम रोखण्याची विनंती केली होती. त्यामुळे ही बाब फसवणुकीची असल्याचे लक्षात आल्यावर बेदरकर यांनी मुखेड न्यायालयात धाव घेतली होती.
दरम्यान, खटल्याच्या सुनावणीदरम्यान फिर्यादी शीलाबाई बेदरकर यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र सतीश बेदरकर यांनी कायदेशीर वारसदार म्हणून खटल्यात सहभाग घेतला.
फिर्यादीतर्फे अॅड. शिवकुमार साताळे यांनी प्रभावी युक्तिवाद सादर केला, तर आरोपीतर्फे अॅड. नावंदर यांनी बाजू मांडली. प्रकरणाच्या सखोल सुनावणीनंतर न्यायालयाने रोहिणी कांबळे यांना दोषी ठरवत कारावास आणि भरपाईचा निर्णय दिला.
हा निकाल फसवणुकीसाठी धनादेश वापरणाऱ्यांसाठी धडा ठरेल, असे मत कायदेतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button