परभणीत मोठी दुर्घटना; हनुमान मंदिराचा सभा मंडप कोसळून ७ जणांचा मृत्यू, ३२ भाविक जखमी

परभणी: प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ २० जून २६
परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील यशवाडी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात आज एक अत्यंतदुर्दैवी आणि मोठी दुर्घटना घडली. मंदिराच्या सभा मंडपाचे छत अचानक कोसळल्याने ७ भाविकांचा मृत्यू झाला असून, ३२ जण गंभीर जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली ३० ते ४० जण दबले गेले होते. शनिवार असल्याने मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी होती, त्याच वेळी हा अपघात घडला.

यशवाडी हे परिसरातील एक जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असल्याने, येथे दर शनिवारी आजूबाजूच्या जिल्ह्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. आज सकाळ पासूनच मंदिरात भाविकांची मोठी रिघ लागली होती. मुख्य मंदिरा समोरील सभागृहात दर्शन, कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन सुरू होते. शेकडो भाविक या सभागृहात उपस्थित असतानाच, दुपारी अचानक सभा मंडपाच्या चालू बांधकामाचा एक मोठाभाग पत्त्यासारखा कोसळला. पिलर आणि छताचा संपूर्ण राडारोडा थेट खाली उभ्या असलेल्या भाविकांवर पडल्याने मोठी जीवितहानी झाली. छत कोसळल्याचा प्रचंड आवाज होताच परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेचा थरारक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि पोलीस फौजफाटा तात्काळ घटनास्थळीदाखल झाला. मात्र, मंदिराकडे जाणारा रस्ता अत्यंत अरुंद असल्याने सुरुवातीला बचाव पथक आणि रुग्णवाहिकांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाने युद्धपातळीवर प्रयत्न करून ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दुर्घटना घडल्याचे समजताच जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी तातडीने दखल घेत संपूर्ण शासकीय यंत्रणा आणि वैद्यकीय पथके घटनास्थळी रवाना केली. अनेक ॲम्ब्युलन्स घटनास्थळी तैनात करण्यात आल्या असून जखमींवर तातडीने व योग्य उपचार करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
सध्यास्थानिक प्रशासनाच्या मदतीने परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले असून ढिगारा उपसण्याचे काम पूर्ण झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परभणी जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.



