मुखेडमध्ये RTE प्रवेशाचा बाजार? ‘पैसे द्या आणि प्रवेश मिळवा’ची पालकांमध्ये चर्चा; प्रशासनाचे दुर्लक्ष

▫️RTE प्रवेश प्रकरणात नांदेड शिक्षण विभागातून कनेक्शन असल्याची चर्चा
मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ १० मार्च २६
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलांसाठी राखीव असलेल्या २५ टक्के जागांवर प्रवेश मिळवण्यासाठी सध्या पालकांची मोठी धावपळ सुरू आहे. मात्र, मुखेड शहरासह परिसरात ‘पैसे देऊन काम होत असल्याच्या‘ चर्चांनी जोर धरला असून, यामुळे सर्वसामान्य आणि गरजू पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेमका प्रकार काय?
RTE ची प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आणि लॉटरी पद्धतीवर आधारित असतानाही, काही मध्यस्थ आणि शाळा व्यवस्थापनाशी संबंधित व्यक्ती व नांदेड शिक्षण विभागातून पालकांकडून मोठी रक्कम उकळत असल्याची चर्चा नागरिक उघडपणे करत आहेत. ‘तुमच्या पाल्याचा नंबर लावून देतो असे आमिष दाखवून पालकांची आर्थिक लूट केली जात असल्याचे बोलले जात आहे.
ज्या पालकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे, त्यांच्यासाठी ही योजना एक आशेचा किरण आहे. मात्र, जर अशा प्रकारे पैशांचा व्यवहार करून प्रवेश दिले जात असतील, तर खरोखर पात्र असलेले विद्यार्थी या हक्का पासून वंचित राहतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. “आम्ही रांगेत उभे राहून आणि सर्व नियमांचे पालन करून अर्ज भरतो, पण दुसरीकडे पैशांच्या जोरावर प्रवेश निश्चित केले जात असतील तर या प्रक्रियेवर विश्वास कसा ठेवायचा?” असा सवाल एका संतप्त पालकाने उपस्थित केलाआहे.
या सर्व चर्चांमुळे शिक्षण विभागाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मुखेड येथील शिक्षणविस्तार अधिकारी किंवा गटशिक्षणाधिकारी याकडे लक्ष देऊन अशा प्रवृत्तींना आळा घालणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. जर खरोखरच असे गैरप्रकार घडत असतील, तर दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
‘श्रमिक एकता न्यूज’चे आवाहन: जर आपल्याकडून कोणीही RTE प्रवेशासाठी पैशांची मागणी करत असेल, तर त्याला बळी पडू नका. हा प्रवेश पूर्णपणे मोफत आणि कायदेशीर प्रक्रियेद्वारे मिळतो. अशातक्रारी असल्यास त्वरित संबंधित शिक्षण विभागाकडे किंवा पोलिसांकडे संपर्क साधावा.



