प्रशासनाचे दुर्लक्ष, लोकप्रतिनिधींची उदासीनता; सलगरा-बेटमोगरा रस्ता बनला मृत्यूचा सापळा!

▫️सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागण्या केराची टोपली
मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १९ मार्च २६
तालुक्यातील सलगरा ते बेटमोगरा या दरम्यानचा रस्ता सध्या रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता, अशा भीषण अवस्थेत असून प्रवाशांसाठी तो ‘जीवघेणा‘ ठरत आहे. विशेष म्हणजे, बेटमोगरा हे गाव तालुक्याचे नेतृत्व केलेल्या एका माजी आमदारांचे गाव असतानाही, या मार्गाचे नशीब अद्याप उघडले नाही, ही मोठी शोकांतिका आहे.
ज्या गावाने तालुक्याला आमदार दिले, त्या गावाचा मुख्य रस्ताच जर चिखल आणि खड्ड्यांच्या साम्राज्यात अडकला असेल, तर इतर गावांची काय अवस्था असेल? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. लोकप्रतिनिधींनी सत्तेत असताना आणि सत्ता गेल्यावरही या महत्त्वाच्या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्षकेल्याचा आरोप आता ग्रामस्थ करत आहेत.
या रस्त्याच्या कामासाठी परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी आंदोलने केली, निवेदने दिली आणि प्रशासनाचे दरवाजे ठोठावले. मात्र, प्रत्येक वेळी केवळ आश्वासनांची बोळवण करण्यात आली. सद्यस्थितीत या रस्त्याची अवस्था ‘जैसे थे’ असून, प्रशासनाच्या या ढिम्म कारभारामुळे सर्वसामान्यांचा संयम आता सुटत चालला आहे.

या रस्त्यावरून वेळेत दवाखाना गाठणे म्हणजे मृत्यूशी झुंज देण्यासारखे आहे.
खड्डे आणि धुळीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
वाहनधारकांना दररोज हजारो रुपयांचा फटका दुरुस्तीपोटी बसत आहे.
“प्रशासनाने आता तरी झोपेतून जागे व्हावे, अन्यथा या जीवघेण्या रस्त्यामुळे एखाद्याचा बळी गेल्यास त्याला जबाबदार कोण?” असा जळजळीत प्रश्न आता सलगरा आणि बेटमोगरा परिसरातील जनताविचारत आहे. जर येत्या काळात तातडीने दुरुस्ती सुरू झाली नाही, तर तीव्र जनआंदोलन छेडण्याचाइशारा नागरिकांनी दिला आहे.



