पत्रकार मोहम्मद रफीक यांना ‘न्याय चक्र’ पुरस्कार जाहीर; उद्या मान्यवरांच्या हस्ते होणार सन्मान

नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ २८ मार्च २६
पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे नांदेड येथील पत्रकार मोहम्मद रफीक मोहम्मद खाजामिया यांना यावर्षीचा प्रतिष्ठित ‘न्याय चक्र पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे. उद्या, रविवार दिनांक २९ मार्च रोजी एका विशेष सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.
समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मोहम्मद रफीक यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सतत संघर्ष केला आहे. त्यांच्या याच सामाजिक बांधिलकीची आणि पत्रकारितेतील निस्पृह योगदानाची दखल घेऊन ‘लोक जनजागृती बहुउद्देशीय सेवाभावी संस्थे‘च्या वतीने हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार शीतळे यांच्या अध्यक्षते खालील निवड समितीने या पुरस्कारासाठी मोहम्मद रफीक यांची एकमताने निवड केलीआहे.
हा गौरव सोहळा उद्या रविवार, २९ मार्च रोजी शहरातील देवकृपा फंक्शन हॉल, छत्रपती चौक येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते मोहम्मद रफीक यांचा सन्मान केला जाईल.
मोहम्मद रफीक यांना न्याय चक्र पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सामाजिक, राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रासह मित्र परिवाराकडून मोठ्या प्रमाणावर अभिनंदन होत आहे.



