“पुरोगामी चळवळीचा आधारस्तंभ निखळला!; ह.भ.प. मधुकर महाराज बारुळकर यांचे अपघाती निधन.”

नांदेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ ३१ मार्च २६
समाजप्रबोधनाचे शस्त्र हाती घेऊन जाती–पातीच्या भिंती तोडण्यासाठी आयुष्य वेचणारे, मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि थोर विचारवंत ह.भ.प. मधुकर महाराज बारुळकरयांचे आज मंगळवारी नांदेड शहरात झालेल्या भीषण अपघातात दुःखद निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यावर आणि पुरोगामी चळवळीवर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड शहरातील ढवळे कॉर्नर भागात सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. मधुकर महाराज हे आपल्या कामासाठी जात असताना MH 26 CH 4386 क्रमांकाच्या भरधाव टिपरने त्यांना जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, महाराजांचाजागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती.

मधुकर महाराज बारुळकर हे केवळ एक कीर्तनकार नव्हते, तर ते एक प्रखर समाजसुधारक होते. आपल्या ओघवत्या भाषणातून समाज, राजकारण आणि दैनंदिन जीवनातील विसंगतीवर ते मार्मिक बोटठेवत असत. सर्वसमावेशक समाजाची निर्मिती व्हावी, यासाठी त्यांनी आयुष्यभर जनजागृती केली. त्यांच्या जाण्याने “पुरोगामी विचारांचा एक अनमोल हिरा” हरपला असल्याची भावना व्यक्त होत आहे.

मधुकर महाराज यांच्या पार्थिव देहावर उद्या, बुधवारी (१ एप्रिल) सकाळी ११:०० वाजता त्यांच्या मूळगावी बारुळ (ता. कंधार)येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या निधनामुळे राजकीय, सामाजिकआणि वारकरी क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.




