काळाचा क्रूर घाला! मुलाच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने पित्याचाही मृत्यू; कंधार तालुक्यातील फुलवळवर शोककळा

▫️बाप-लेकावर एकाच वेळी झाले अंत्यसंस्कार; निछलकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर
कंधार (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज (०४ एप्रिल २०२६) निसर्गाचा नियम आहे की मुलाने बापाला खांदा द्यावा, पण कंधार तालुक्यातील फुलवळ येथे नियतीने अत्यंत क्रूर खेळ मांडला. अल्पशा आजाराने मुलाचा मृत्यू झाला आणि हा धक्का सहन न झाल्याने अवघ्या चार तासांत वडिलांनीही प्राण सोडले. हुसेन निछलकर आणि त्यांचे वडील काशीमसाब निछलकर या बाप-लेकावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ निछलकर कुटुंबावर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हुसेन काशीमसाब निछलकर (वय ४३) हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच १ एप्रिल रोजी त्यांचे निधन झाले. कुटुंबाचा मुख्य आधार असलेल्या हुसेन यांच्या निधनाची बातमी ऐकताच, त्यांचे वृद्ध वडील काशीम लालासाब निछलकर (वय ७०) यांना मोठा धक्का बसला. मुलाचा विरह सहन न झाल्याने अवघ्या चार तासांच्या अंतराने काशिमसाब यांचीही प्राणज्योत मालवली.
हुसेन निछलकर यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. गरिबीशी दोन हात करत ते धैर्याने आपल्या कुटुंबाचा गाडा ओढत होते. मात्र, एकाच वेळी घरातील दोन कर्ते पुरुष गेल्यामुळे हे कुटुंब पूर्णपणे उघड्यावर पडले आहे. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, दोन मुले, एक सून आणि दोन बहिणी असा मोठा परिवार असून, त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आता गंभीर बनला आहे.
रात्री उशिरा अत्यंत शोकाकुल वातावरणात बाप-लेकावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण फुलवळ गावावर शोककळा पसरली असून गावकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आहे. “या हसत्या-खेळत्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे, शासनाने आणि दानशूर व्यक्तींनी या कुटुंबाला आर्थिक मदत करावी,” अशी आर्त हाक गावकऱ्यांकडून देण्यात येत आहे.



