महसूल प्रशासनाच्या नाकाखाली रेती माफियांचा नंगानाच; तक्रारीनंतरही मुखेड तहसील समोरून अवैध वाहतूक सुरूच!

◽️नूतन तहसीलदार विकास हे ‘सिंघम’ स्टाईलने कारवाई करणार का?
मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ ५ मे २६
मुजोर रेती माफियांनी मुखेड महसूल प्रशासनाला जणू काही गृहीतच धरले असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. रात्रीच्या वेळी चक्क मुखेड तहसील कार्यालया समोरून क्षमतेपेक्षा जास्त(ओव्हरलोड) अवैध रेतीची वाहतूक राजरोसपणे सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यापूर्वी अनेक तक्रारी होऊन आणि बातम्या प्रकाशित होऊनही या प्रकाराला आळा बसलेला नाही. त्यामुळे आता नूतन तहसीलदार विकास हे या माफियांच्या मुसक्या आवळून आपला दरारा निर्माण करणार का? याकडेसंपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
तहसील कार्यालय ही तालुक्याची सर्वोच्च प्रशासकीय इमारत आहे. या इमारतीच्या समोरूनच रात्रीच्या शांततेत ओव्हरलोड ट्रक आणि हायवा धावत असल्याने माफियांचे धाडस किती वाढले आहे, हे स्पष्ट होते. सातत्याने बातम्या प्रसिद्ध होऊनही जर हे प्रकार थांबत नसतील, तर यामागे नेमके कोणाचे‘वरदहस्त‘ आहेत? असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे.
नूतन तहसीलदार विकास हे यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल तालुक्यातचर्चा असली तरी, रेती माफियांचे हे ‘ओपन चॅलेंज‘ त्यांच्यासमोर मोठे आव्हान ठरत आहे. कागदोपत्री कारवाया करण्यापेक्षा प्रत्यक्ष मैदानात उतरून या अवैध वाहतुकीचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
यापूर्वी अनेक प्रसारमाध्यमांनी या अवैध वाहतुकीचे वाभाडे काढले आहेत. मात्र, तरीही रात्रीच्या वेळी हीअवैध वाहतूक सुरूच असणे, हे महसूल विभागाच्या भरारी पथकाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. माफियांच्या या मुजोरीमुळे रस्त्यांची दुरवस्था होत असून अपघातांचा धोकाही वाढलाआहे.
तहसील कार्यालयाच्या दारातून अवैध रेतीचे ट्रक जातातच कसे? हा मुखेडकरांसाठी चिंतेचा विषय आहे. नवीन तहसीलदार विकास हे यांनी आता कठोर पावले उचलून या माफियांची दादागिरी मोडीत काढावी, हीच अपेक्षा.



