शासकीय आदेशाला केराची टोपली! मुखेड दुय्यम निबंधक कार्यालयात अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी न केल्याने समाजबांधव आक्रमक; तलाठी-पेशकारांच्या समक्ष जागेवरच पंचनामा!

मुखेड प्रतिनिधी :- श्रमिक एकता न्यूज़ ३१ मे २६
शासकीय आदेशांना पायदळी तुडवत मुखेड शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली नसल्याचा अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. राज्य शासनाचे कडक निर्देश असतानाही एका जबाबदार शासकीय कार्यालयात महापुरुषांची जयंती साजरी न करणे, हा थेट शासकीय आदेशाचा अवमान आणि समाजाच्या भावनांशी खेळ असल्याचा आरोप होत आहे. या गंभीर प्रकारामुळे मुखेड तालुक्यातील समाज बांधवांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, नागरिकांनी थेट कार्यालयात धडक देत प्रशासनाला धारेवर धरले.
घटनेची माहिती मिळताच या प्रकरणाची गंभीर दखल घेत तहसील प्रशासनाने तातडीने पावले उचलली. मुखेडचे तलाठी देशमुख आणि पेशकार हक्के यांनी तात्काळ दुय्यम निबंधक कार्यालयात धाव घेतली. उपस्थित समाजबांधवांच्या आणि अधिकाऱ्यांच्या समक्ष या संपूर्ण लाजिरवाण्या प्रकरणाचा जागेवरच‘पंचनामा’ करण्यात आला. शासकीय कार्यालयात जयंती न साजरी झाल्याचे पंचनाम्यातून अधिकृतपणे समोर आले आहे.
महापुरुषांचा अवमान करणाऱ्या आणि शासकीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित दुय्यम निबंधक अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी समाज बांधवांनी लावून धरली आहे. “अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांची शासकीय सेवेत गय केली जाणार नाही,” असा इशाराही समाज बांधवांनी दिला असून, वरिष्ठ पातळीवर या संदर्भात कडक कारवाईचे निवेदन सादर केले जाणार आहे.
या गंभीर प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी आणि पंचनामा करून घेण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात मोठ्या संख्येने समाजबांधव आणि तरुण एकत्र आले होते. यामध्ये प्रामुख्याने माधव देवकते, अनिकेत कांबळे, बाळू नाईक, पप्पू इंगळे, कृष्णा कामजे, सुधाकर सुरनर, ज्ञानेश्वर श्रीरामे, माधव गोपनर, सचिन श्रीरामे, सदाशिव देवकते, संदीप गवते, गजानन देवकते, विशाल शेळके, शिवराज हेळगिरे, पवन डुबुकवाड, हणमंत हराळे, रामेश्वर हेळगिरे, ओंकार हराळे, सुरेश दारसेवाड, शिवशंकर हराळे, श्रीधर टेळगिरे, गणेश विठ्ठल, रणजीत जहूरे यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
आता लक्ष लागून राहिले आहे ते वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे. शासकीय आदेश धुडकावणाऱ्या या अधिकाऱ्यावर प्रशासन कधी आणि काय कारवाई करणार? की या प्रकरणावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न होणार? याकडे संपूर्ण मुखेड तालुक्याचे डोळे लागले आहेत.



