घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू देण्याची छावाची मागणी !

मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ २० जून २६
मुखेड तालुक्यातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत वाळू अद्याप उपलब्ध झाली नसुन ती त्वरित उपलब्ध करून द्यावे अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने तालुकाध्यक्ष गिरिधर पाटील केरुळकर यांनी खा. रविंद्र चव्हाण व जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सन २०२५ एप्रिल मध्ये महाराष्ट्र शासनाने जाहीर केल्यानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याची घोषणा केली होती. पण ती कोणाला वाळू मिळाली देवालाच माहीत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत मोफत वाळूचे मोठ्या प्रमाणात वितरण करण्यात आले. मग मुखेड तालुक्यातील शहरी व रमाई, प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना दिली जाणारी मोफत वाळू गेली कुठे? यामागचे खरे गौडबंगाल काय? एक तर पाच ब्रास वाळू द्या नाहीतर प्रत्येक घरकुल धारकांना पाच ब्रास वाळूचा आर्थिक मोबदला ३० हजार रुपये द्या! या मागणीसाठी व अन्य इतरही महत्वपूर्ण मागण्यांसाठी लवकरच मोठे जन आंदोलन छेडले जाणार असल्याचे छावा चे मुखेड तालुकाध्यक्ष गिरिधर पाटील केरुळकर यांनी सांगितले आहे.



