शंकरसागर जलाशयात माय-लेकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू; नांदेडजवळील विष्णुपूर येथील घटना

नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ २१ जून २६
शहराशेजारीच असलेल्या विष्णुपुरी येथील शंकरसागर जलाशयात एक महिला आणि तिच्या तरुण मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोदावरी नदीच्या पात्रात या दोघांचेही मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडालीआहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विष्णुपुरी भागातील प्रसिद्ध काळेश्वर मंदिर परिसराजवळ हा शंकरसागर जलाशय आहे. रविवार, दिनांक २१ जून रोजी या भागात दर्शनासाठी आलेल्या काही भाविकांना जलाशयाच्या पात्रात एक महिला आणि एका तरुणाचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले. भाविकांनीया घटनेची माहिती तात्काळ नांदेड ग्रामीण पोलिसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पथकाने तात्काळ घटनास्थळ गाठले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी पाण्यावर तरंगत असलेले महिला व तरुणाचे मृतदेह सुखरूप पात्राबाहेर काढले.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून वेगाने तपासाची चक्रे फिरवली आणि अवघ्या काही वेळातच दोन्ही मृतदेहांची ओळख पटवण्यात यश मिळवले. हे मृतदेह संगवाबाई कळसकर (वय ५५ वर्षे) आणि त्यांचा मुलगा शुभम कळसकर (दोघे रा. माहिती उपलब्ध नाही) यांचे असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी विष्णुपुरी येथील शासकीय विष्णुपुरी जिल्हा रुग्णालय पाठवण्यात आले आहेत. या माय–लेकरांचा मृत्यू जलाशयाच्या काठावर पाय घसरून पाण्यात पडल्यामुळे झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या दुर्दैवी घटने प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. एकाच कुटुंबातील माय–लेकाचा असा अचानक अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



