मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाचा धुरा यशवंतराव बोडकेंच्या हाती!

▫️नूतन कार्यकारिणीची सर्वानुमते घोषणा; पत्रकारांच्या हक्कांसाठी प्रामाणिकपणे लढण्याचा नवनिर्वाचित अध्यक्षांचा निर्धार
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड :- १४ ऑगस्ट २६
मुखेड तालुका पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीची निवड गुरुवार, १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली. नांदेड मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सरचिटणीस अनुराग पोवळे, ज्येष्ठ पत्रकार प्रल्हाद लोहेकर, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संदीप कामशेटे आणि ॲड. सुनील पौळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या निवड प्रक्रियेत संघाच्या अध्यक्षपदी प्रा. यशवंत बोडके, तर सचिवपदी ज्ञानेश्वर डोईजड यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच, याच बैठकीत नांदेड जिल्हा कार्यकारिणीवर ‘जिल्हा संघटक’ म्हणून मुखेडचे ज्येष्ठ पत्रकार शिवाजी कोनापुरे व किशोर संगेवार यांचीही महत्त्वपूर्ण निवड करण्यात आली.

जाहीर करण्यात आलेल्या या नूतन कार्यकारिणीत कार्याध्यक्ष म्हणून अविनाश देशमुख, तर उपाध्यक्ष म्हणून शेखर पाटील व संतोष बेळगे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच सहसचिवपदी राजेश बंडे, संघटकपदी नामदेव यलकटवार व दत्ता कांबळे, कोषाध्यक्षपदी रामदास पाटील व संजय कांबळे, तर प्रसिद्धीप्रमुख म्हणून हाफिज पठाण व गणेश आंबेकर यांची निवड झाली आहे. या कार्यकारिणीत सदस्य म्हणून शरद जोगदंड, जैनोद्दीन पटेल, नामदेव श्रीमंगले, विठ्ठल पाटील आणि राजू रोडगे यांचा समावेश करण्यात आला आहे. संघाला वेळोवेळी मार्गदर्शन करण्यासाठी ज्येष्ठ सल्लागार म्हणून सुशील पत्की, शिवकांत मठपती, ॲड. आशिष कुलकर्णी, दादाराव आगलावे, शेख मेहताब आणि अनिल कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली असून, या नव्या सर्वसमावेशक कार्यकारिणीवर सध्या सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नूतन अध्यक्ष प्रा. यशवंत बोडके व सचिव ज्ञानेश्वर डोईजड यांनी निवडीनंतर आपला संकल्प व्यक्त केला. आगामी काळात मुखेड तालुक्यातील पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी संघाच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला. पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी संघटितपणे पाठपुरावा करण्याबरोबरच, मुखेड तालुक्यातील ‘पत्रकार भवन’ उभारणीचा प्रलंबित प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या नव्या कार्यकारिणीमुळे पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फुटेल, अशी अपेक्षा तालुक्यातील पत्रकार बांधवांकडून व्यक्त होत आहे.
या बैठकीला तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनिर्वाचित सचिव ज्ञानेश्वर डोईजड यांनी केले, तर आभार कार्याध्यक्ष अविनाश देशमुख यांनी मानले.



