बाह्राळी जवळ भरधाव कारच्या धडकेत तरुणाचा बळी; शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर

▫️सुट्टीवर गावी आलेल्या तरुण पोस्टमास्टरचा भीषण अपघातात मृत्यू
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड / बाह्राळी: १६ ऑगस्ट २६
स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीनिमित्त गावी आलेल्या एका ३० वर्षीय तरुणाचा भरधाव कारच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची भीषण घटना बाह्राळी (ता. मुखेड) येथे घडली. शेख फय्याज जावेदसाब (वय ३०) असे या अपघातात प्राण गमावलेल्या तरुणाचे नाव असून, ते मुंबई येथे पोस्टमास्टर म्हणून कार्यरत होते. हा दुर्दैवी अपघात शनिवारी (दि. १५ ऑगस्ट) सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घडला.
शेख फय्याज हे मुंबईत पोस्टमास्टर पदावर कार्यरत होते व त्यांच्या नोकरीला नुकतीच तीन वर्षे पूर्ण झाली होती. स्वातंत्र्य दिनानिमित्त ते बाह्राळी येथे आपल्या घरी आले होते. शनिवारी सायंकाळी ते बाह्राळी–मुक्रमाबाद (वडगाव) रोडवर फिरण्यासाठी गेले होते. फेरफटका मारून परत येत असताना, नांदेड–बिदर राष्ट्रीय महामार्गावरील ‘योगायोग बार अँड रेस्टॉरंट‘ जवळ पाठीमागून येणाऱ्या एका अज्ञात भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली कारची धडक इतकी भीषण होती की फय्याज यांना तब्बल दीडशे ते दोनशे फूट अंतरापर्यंत फरफटत नेले गेले. या भयानक अपघातात त्यांच्या डोक्याला तसेच शरीराच्या इतर भागांना अतिशय गंभीर दुखापत झाली, ज्यामुळे घटनास्थळीच त्यांची प्राणज्योत मालवली.
या भीषण अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली, ज्यामुळे महामार्गावर काही काळ गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात येऊन या प्रकरणाची चौकशी केली. फय्याज यांचा मृतदेह मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला असून, रविवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर शवविच्छेदन (पोस्टमार्टम) करण्यात येणार असल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले.
फय्याज यांच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. अवघ्या ३० व्या वर्षी, नोकरीत नुकतेच कुठे स्थिरावत असतानाच एका होतकरू तरुणाचा असा अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या पत्नी व मुलांचा आधार हरपला आहे. या आकस्मिक निधनामुळे शेख कुटुंबीय, नातेवाईक, मित्र परिवार आणि संपूर्ण बाह्राळी परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीसयाप्रकरणी पसार झालेल्या कार चालकाचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.



