पर्यावरण संवर्धनासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; बाराहाळी नाक्यावरील डिव्हायडरवर लावली झाडे.

▫️शहराच्या सौंदर्यात आणि पर्यावरण संवर्धनात पडणार भर
श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड: २१ ऑगस्ट २६
शहरात हिरवळ वाढवण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी रोटरी क्लब ऑफ मुखेड सिटीच्या वतीने बाराहाळी नाका येथील डिव्हायडरवर मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले.
वाढत्या तापमानात आणि बदलत्या हवामानात झाडांचे महत्त्व ओळखून हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. या वृक्षारोपण कार्यक्रमा प्रसंगी रोटरी क्लब ऑफ मुखेड सिटीचे अध्यक्ष डॉ. श्रीहरी बुडगेमवार, सचिव पवन पोतदार यांच्यासह रोटरी क्लबचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहरातील मुख्य रस्ते आणि नाक्यांवर अशा प्रकारच्या वृक्षारोपणामुळे केवळ प्रदूषण कमी होण्यास मदत होणार नाही, तर मुखेड शहराच्या सौंदर्यातही मोठी भर पडणार आहे. डिव्हायडरवर लावण्यात आलेली ही झाडे भविष्यात वाटसरूंना सावली देण्या सोबतच परिसरातील वातावरण आल्हाददायक ठेवतील.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी शहरातील इतर नागरिकांना आणि प्रशासनालाही वृक्षलागवड व त्यांचेसंवर्धन करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. रोटरी क्लबने राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे शहरवासीयांकडून मोठे कौतुक होत आहे.



