बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याच्या रागातून खून; मुखेड पोलिसांनी अवघ्या ५ तासांत आवळल्या तिन्ही आरोपींच्या मुसक्या

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड : २१ ऑगस्ट २६
मौजे लादगा शिवारात प्रेम प्रकरणातून आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याच्या रागातून एका व्यक्तीचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या तीन आरोपींना मुखेड पोलिसांनी अत्यंत वेगाने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या पाच तासांत जेरबंद केले आहे.
सविस्तर वृत्त असे की,मुखेड पोलीस ठाण्यात आरोपी किशन राजकुमार जोगदंड (रा. दापका राजा) याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. याच गोष्टीचा राग मनात धरून दिनांक २० ऑगस्ट२०२६ रोजी रात्री ११:०० वाजेच्या सुमारास आरोपी किशन जोगदंड व त्याचे मित्र सोहम ऊर्फ सोम्या बयास आणि मंग्या लिंगे (सर्व रा. दापका राजा) यांनी संगनमत केले.
या तिन्ही आरोपींनी फिर्यादीचे वडील यांच्या लादगा शिवारातील शेतात जाऊन त्यांच्या डोक्यात चाकूने गंभीर वार करत त्यांना जीवे मारले. तसेच, फिर्यादीच्या आईच्या तोंडावर चाकूनेवार करून त्यांनाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
या भयंकर घटनेनंतर मुखेड पोलीस ठाण्यात गु.र.नं. २८८/२०२६ अंतर्गत बीएनएस (BNS) कलम १०३(१), १०९(१), ३५१(२), ३५१(३), ३(५) तसेच अॅट्रॉसिटी कायद्यानुसार (अ.जा.अ.ज. प्रतिबंधक कायदा) गुन्हा नोंदविण्यात आला.
नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या आदेशानुसार गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी (बिलोली) शाम पानेगावकर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (देगलूर) वैभव पडवळ यांनी घटनास्थळी तत्काळ भेट दिली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मुखेड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेगाने तपास करत पळून गेलेल्या १) किशन राजकुमार जोगदंड (वय २२ वर्षे, रा. दापका राजा) २) सोहम सुंदरसिंह बयास (वय १९ वर्षे, रा. दापका राजा) ३) मंगेश निवृत्ती लिंगे (वय ५० वर्षे, रा. दापका राजा) या तीन आरोपींना अवघ्या ५ तासांत शोधून ताब्यात घेतले सदर यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड, स.पो.उप.नि. गणेश माने, पो.उप.नि. अभिजित तुतुरवाड, पो.उप.नि. संदीप यामावार आणि त्यांच्या पथकाने केली. यागुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर हे करत आहेत. मुखेड पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.



