नांदेडमध्ये सुनेनेच केला सासूचा खून; अनैतिक संबंधात अडथळा ठरल्याने प्रियकराच्या मदतीने काढला काटा

नांदेड प्रतिनिधी:- २८ जानेवारी २६
नांदेड: जिल्ह्यातील हदगाव शहरात माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरणाऱ्या सासूचा सुनेनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने गळाआवळून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मयत महिलेची सून, तिचा प्रियकर आणि इतर दोन साथीदारांना अटक केली आहे. कमलाबाई क्षीरसागर (वय ५४) असे मयत महिलेचे नाव आहे.
नेमकी घटना काय? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि विविध वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, कमलाबाई क्षीरसागर या हदगाव तहसील कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत होत्या. काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या एकुलत्या एक मुलाचे निधन झाले होते. त्यानंतर त्या आपली विधवा सून सुनीता(वय ३५) आणि नातवासोबत राहत होत्या. मात्र, सून सुनीताचे तिच्यापेक्षा वयाने ८ वर्षे लहान असलेल्या परमेश्वर वानखेडे (वय २६) या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. पतीच्या निधनानंतर हे संबंध अधिकच वाढलेहोते.
असा रचला हत्येचा कट कमलाबाई यांना सुनेच्या या अनैतिक संबंधांची कुणकुण लागली होती आणित्यास त्यांचा सक्त विरोध होता. यावरून सासू–सुनेमध्ये वारंवार खटके उडत होते. आपल्या प्रेमात सासू अडथळा ठरत असल्याच्या रागातून सुनीताने प्रियकर परमेश्वर सोबत मिळून सासूचा काटा काढण्याचे ठरवले. १० जानेवारीच्या रात्री कमलाबाई गाढ झोपेत असताना, सुनीता आणि परमेश्वरने स्कार्फने गळाआवळून त्यांची हत्या केली.
पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी सुनीताने आपला भाऊ अमोल इटकरेआणि नातेवाईक अक्षय कदम यांची मदत घेतली. त्यांनी मृतदेह एका पोत्यात भरून दुचाकीवरून नेलाआणि वाळकी फाटा येथील पैनगंगा नदीपात्रात फेकून दिला. सुरुवातीला सासू बेपत्ता असल्याची तक्रारनातवाने दिली होती, परंतु नदीपात्रात मृतदेह सापडल्याने पोलिसांचा संशय बळावला.
पोलिसांनी लावला छडा हदगाव पोलिसांनी तांत्रिक तपास, मोबाइल लोकेशन आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास वेगाने फिरवला. यात मयत महिलेची सून आणि तिच्या प्रियकराच्या हालचालीसंशयास्पद आढळल्या. पोलिसांनी खाक्या दाखवताच सुनेने गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून त्यांना २८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.



