शहर

सर्पदंश झाल्यास अंधश्रद्धेला बळी पडू नका; तातडीने शासकीय रुग्णालयात उपचार घ्या : जिल्हा शल्य चिकित्सक

श्रमिक एकता न्यूज नेटवर्क नांदेड :- २६ सप्टेंबर २६ 

सर्पदंश ही एक तातडीची वैद्यकीय आणीबाणी असून वेळेत योग्य उपचार मिळाल्यास रुग्णाचे प्राणनिश्चितपणे वाचवता येतात. त्यामुळे मांत्रिक, झाडफूक किंवा जडीबुटी अशा कोणत्याही अंधश्रद्धेला बळी न पडता रुग्णाला तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करावे, असे आवाहन जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनाने सर्पदंशाचा समावेश ‘अधिसूचित आजार‘ म्हणून केला असून, नांदेड जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण, उपजिल्हा व जिल्हासामान्य रुग्णालयात सर्पदंशावरील ‘अँटी–स्नेक व्हेनम‘ (ASV) व आवश्यक औषधसाठा पुरेसा उपलब्ध आहे.

सर्पदंशानंतर रुग्णाला घाबरू न देता शांत ठेवावे आणि दंश झालेला अवयव जास्त हालचाल न करतापट्टी वा कापडाने स्थिर ठेवावा. सूज येण्यापूर्वी अंगठी, घड्याळ व घट्ट कपडे काढून टाकावेत. रुग्णाला चालवत नेण्याऐवजी १०८ किंवा १०२ रुग्णवाहिकेच्या मदतीने थेट रुग्णालयात न्यावे. दंशाच्या जागी ब्लेडने कापणे, तोंडाने विष शोषण्याचा प्रयत्न करणे किंवा दोरीने अतिघट्ट बांधणे असे धोकादायकप्रकार कटाक्षाने टाळावेत. तसेच शेतात काम करताना मजबूत पादत्राणे वापरणे, रात्री बॅटरी–काठीसोबत ठेवणे आणि जमिनीवर न झोपता खाट व मच्छरदाणीचा वापर करणे गरजेचे आहे. वेळेवर मिळणारे वैद्यकीय उपचार हाच रुग्णाचा जीव वाचवण्याचा एकमेव खात्रीशीर मार्ग आहे, असे आवाहन डॉ. पेरके यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button