Uncategorized

कंधार बहादरपुरा पुलावरून कार थेट नदीत कोसळली; पती बचावला, पत्नी बेपत्ता


श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क कंधार/नांदेड: १६ ऑक्टोंबर २६

नांदेडहून जांब–मुखेडच्या दिशेने जाणारी एक कार शुक्रवारी पहाटेच्या सुमारास बहादरपुरा पुलावरून थेट नदीत कोसळल्याची थरारक घटना घडली आहे. या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या अपघातातून कारचालक पती सुदैवाने बचावला असून, त्यांच्या पत्नीचा मात्र अद्याप शोध लागलेला नाही. ही धडकी भरवणारी घटना शुक्रवारी मध्यरात्री नंतर साधारण २ वाजेच्या सुमारास घडली.

प्राथमिक माहितीनुसार, मुखेड तालुक्यातील सावरगाव (पि.वाडी) येथील रहिवासी लक्ष्मण संभाजी गुट्टे(वय ४४ वर्षे) आणि त्यांची पत्नी पार्वती लक्ष्मण गुट्टे (वय ४० वर्षे) हे दाम्पत्य रात्रीच्या वेळी कारने प्रवासकरत होते. त्यांची कार बहादरपुरा पुलावरून जात असताना अचानक गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट पुलावरून खाली अंधाऱ्या नदीत कोसळली.

कार पाण्यात पडल्यानंतर लक्ष्मण गुट्टे यांनी प्रसंगावधान राखत कसेबसे कारच्या बाहेर येत स्वतःचा जीव वाचवला. मात्र, नदीतील पाण्याचा प्रवाह आणि रात्रीचा मिट्ट काळोख यामुळे त्यांना आपल्या पत्नीला गाडी बाहेर काढण्यात यश आले नाही. पाहता पाहता त्यांची कार पूर्णपणे पाण्यात गडप झाली.

या भीषण घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन बचाव पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सकाळी क्रेनच्या साहाय्याने आणि अथक प्रयत्नांनंतर दुर्घटनाग्रस्त कार नदीतून बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे.

मात्र, अद्याप पार्वती गुट्टे यांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नसून, बचाव पथकाकडून नदीपात्रात त्यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात असून, स्थानिक पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button