लादगा येथे माणुसकीला काळीमा: तहानलेल्या महिलेवर अत्याचार, पीडितेची आत्महत्येने जीवनयात्रा संपवली

मुखेड ( प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ ०८ एप्रिल २६
माणुसकीला लाजवेल अशी एक संतापजनक घटना लादगा (ता. मुखेड) येथे घडली आहे. पाणी पिण्यासाठी गेलेल्या एका असहाय्य महिलेवर अत्याचार करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा खळबळ जनक प्रकार समोर आला आहे. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला असून आरोपीच्या विरोधात कडक कारवाईची मागणी होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विवाहित महिला आपल्या शेतात काम करत होती. कडक उन्हामुळे तहान लागल्याने ती पाणी पिण्यासाठी शेजारच्या शेतात गेली. मात्र, तेथे असलेल्या रमेश्वर शिवाजी कोंडलवाडे याने तिला एकटे पाहून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. या अघोरी कृत्यामुळे पीडितेच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता.
झालेल्या प्रकारामुळे कमालीच्या मानसिक दडपणाखाली असलेल्या या महिलेने अखेर टोकाचे पाऊल उचलले. राहत्या घरात गळफास घेण्या पूर्वी तिने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. “आरोपीने दिलेल्या त्रासामुळे मी माझे पती आणि मुलांपासून कायमची दूर जात आहे,” असा मजकूर लिहून तिने आपला जीव दिला. एका आईने अशा प्रकारे मुलांना सोडून जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याप्रकरणी बालाजी पुंडलिक केंद्रे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुखेड पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेच्या कलम १०८ आणि ६४(१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि अशा गुन्हेगारांवर जरब बसवण्यासाठी प्रशासनाने फास्ट ट्रॅककोर्टात खटला चालवावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.



