प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर खरबखंडगाव येथील ८० वर्षीय वृद्ध महिलेचे उपोषण सुटले.

▫️वादग्रस्त जागेवरील बांधकाम थांबवण्याचे आदेश
मुखेड : प्रतिनिधी श्रमिक एकता न्यूज़ ०७ एप्रिल २६
न्यायासाठी लढा देणाऱ्या एका ८० वर्षीय वृद्ध माऊलीच्या संयमाला अखेर यश आले आहे. मुखेड तालुक्यातील खरबखंडगाव येथील मयत सखाराम मरीबा कांबळे यांच्या मालकीच्या जागेवर गावातीलच काही धनदांडग्यांनी जबरदस्तीने सुरू केलेले बांधकाम प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर थांबवण्यात आले असून, प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्याने मरुबाई सखाराम कांबळे यांनी आपले ८ दिवसीय उपोषण मागे घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत सखाराम कांबळे यांची वारसदार पत्नी मरुबाई कांबळे आणि त्यांची सून लक्ष्मीबाई राजाराम कांबळे या आपल्या कुटुंबासह उदरनिर्वाहासाठी काही काळ बाहेरगावी गेल्या होत्या. याच संधीचा फायदा घेऊन गावातील शिवाजी एकाळे, परमेश्वर एकाळे आणि यादवराव एकाळे यांनी संगनमताने ग्रामपंचायत कर्मचारी व अधिकाऱ्यांना हाताशी धरून, गेल्या २ वर्षांपासून या कुटुंबाची मालकी हक्काची जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर या जागेवर बेकायदेशीर बांधकाम सुरू करून अनुसूचित जातीच्या या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती.
आपल्या हक्काच्या जागेसाठी मरुबाई कांबळे यांनी सोमवार, ३० मार्चपासून तहसील कार्यालया समोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. कडाक्याचे ऊन आणि वाढते वय असूनही ही माऊली न्यायासाठी ठाम राहिली. त्यांच्या या लढ्याला ‘मास‘ (मातंग अस्मिता संघर्ष सेना) संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष नितीन तलवारे व इतर पदाधिकाऱ्यांनी खंबीर पाठिंबा दिला होता.
उपोषणाच्या आठव्या दिवशी, ६ एप्रिल रोजी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मुखेडचे तहसीलदार राजेश जाधव, गटविकास अधिकारी शिवाजी ढवळे, ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे तालुकाध्यक्ष सय्यद नजीरसाब आणि डॉ. आदमपूरकर यांनी उपोषणस्थळी भेट दिली. प्रशासनाकडून देण्यात आलेल्या पत्रात(जा.क्र.पसमु/पंचायत/५५/२०२६) स्पष्ट करण्यात आले की वादग्रस्त मालमत्ते संदर्भात महसूल व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांची संयुक्त समिती स्थापन केली असून, १० दिवसांत सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. वादग्रस्त जागेवरील सुरू असलेले बांधकाम तात्काळ स्थगित (बंद) करण्याचे आदेश ग्रामपंचायत अधिकारी, खरबखंडगाव यांना देण्यात आले आहेत.
उपोषणकर्त्यांना निवासासाठी शासकीय मालमत्ते पैकी प्लॉट उपलब्ध करून देण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला जाईल.

तहसीलदारांनी प्रत्यक्ष भेट देऊन लिंबू पाणी पाजले आणि लेखी आश्वासन दिल्यानंतर मरुबाई कांबळे यांनी आपले उपोषण सोडले. यावेळी ग्रामसेवक संघटनेचे सचिव सतीश गायकवाड, खंडगावचे ग्रामपंचायत अधिकारी आनंदा बिरू, नायब तहसीलदार एस एस मामिलवाड,कॉम्रेड विनोद गोविंदवार ,नितीन तलवारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
न्यायासाठी लढणाऱ्या एका वृद्ध महिलेला प्रशासनाने दिलेला हा दिलासा तालुक्यात चर्चेचा विषय ठरलाआहे.



