नवऱ्याला शॉक देऊन ठार मारणाऱ्या बायकोला जन्मठेपेची शिक्षा !

▫️भोकर जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी पत्नी आम्रपाली हैबतेला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
भोकर प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ ०७ मे २६
चारित्र्यावर संशय घेतल्याच्या रागातून विजेचा शॉक देऊन पतीची हत्या करणाऱ्या पत्नीस भोकरच्या न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपी आम्रपाली भीमराव हैबते (रा. तळेगाव, ता. उमरी) असे जन्मठेपेची शिक्षा झालेल्या महिलेचे नाव आहे. तिने पती भीमराव नागोराव हैबते यांची विजेचा शॉक देऊन हत्या केल्याचे कोर्टात सिद्ध झाले. १५ जून २०१९ रोजी भीमराव हैबते हे नशेत घरी येऊन झोपले होते. त्यावेळी आरोपी आम्रपाली हिने घरातील विद्युत तारांच्या मदतीने बाजेवर झोपलेल्या पतीला विजेचा शॉक देत त्यांची हत्या केली.

त्यानंतर पतीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा बनाव तिने रचला होता. मात्र, नातेवाइकांना संशय आल्याने त्यांनी विचारणा केली असता तिने उडवा उडवीची उत्तरे दिली. मृत्यूबाबत शंका निर्माण झाल्याने मयताच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी पत्नीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन पोलिस निरीक्षक उत्तम मुंडे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. कोर्टात नऊ साक्षीदारांचे जबाब, घटनास्थळाचे पुरावे, वैद्यकीय अहवाल आणि मुलाची साक्ष या आधारे आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध झाला. यावरून जिल्हासत्र न्यायाधीश मोहम्मद नासिर मोहम्मद सलीम यांनी आरोपी आम्रपाली हैबते हिला जन्मठेप, दंड तसेच सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता ॲड. अनुराधा डावकरेयांनी युक्तिवाद केला.



