नांदेडमध्ये आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्रांचे रॅकेट? चीन, अमेरिकेसह परदेशातून आणलेला साठा पोलिसांच्या जाळ्यात!

▫️वजीराबाद हद्दीत पोलिसांचा मोठा छापा ४३ लाखांचा शस्त्रसाठा जप्त; ४,७९६ तलवारी अन् खंजीर पकडले!
नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ ७ मे २६
नांदेड ग्रामीण पोलिसांनी शहरात सुरू असलेल्या अवैध शस्त्र तस्करीवर मोठा प्रहार केला आहे. वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या एका धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल ४ हजार ७९६ विविध प्रकारची धारदार शस्त्रे जप्त केली आहेत. या शस्त्रांची बाजारपेठीय किंमत अंदाजे ४३ लाख ४८ हजार रुपये असून, या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांना खबऱ्यामार्फत शहरातील वजीराबाद हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रसाठा असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे चिंचोलकर यांनी आपल्या पथकासह बुधवारी सायंकाळी गुरुद्वारा परिसरात सापळा रचून छापेमारी केली.
या कारवाईत पोलिसांनी जप्त केलेल्या साठ्यामध्ये तलवारी, कुपऱ्या, खंजीर आणि इतर अनेक घातकशस्त्रांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, प्राथमिक तपासात हा शस्त्रसाठा केवळ देशांतर्गत नसून कोलंबिया, चीन आणि अमेरिका यांसारख्या देशांतून आयात करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर विदेशी बनावटीची शस्त्रे शहरात कशी पोहोचली, याचा तपास आता युद्धपातळीवर सुरू आहे.

याप्रकरणी पोलिसांनी जसवंतसिंघ प्रकाशसिंघ सुखमनी (रा. रामदासनगर, नांदेड) याला ताब्यात घेतले आहे. या गुन्हेगारी रॅकेटमध्ये आणखी कोणाचे धागेदोरे गुंतलेले आहेत, हा शस्त्रसाठा कोठे विक्रीसाठी नेला जाणार होता आणि यामागे काही मोठा कट होता का, या दिशेने पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. सध्या जप्त केलेली सर्व शस्त्रे ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारात सुरक्षित ठेवण्यात आली आहेत.

गेल्या काही दिवसांपासून नांदेडमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एप्रिल महिन्यात अवघ्या ७२ तासांत खुनाच्या पाच घटना घडल्या होत्या. तसेच, मागील दोन महिन्यांत शस्त्रबाळगल्या प्रकरणी जवळपास ९५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेली ही ४७०० हून अधिक शस्त्रांची जप्ती गुन्हेगारांचे कंबरडे मोडणारी ठरणार आहे.
राज्यातील अवैध शस्त्र व्यवहारावर आळा घालण्याच्या दृष्टीने नांदेड पोलिसांनी केलेली ही आजवरची सर्वात मोठी आणि यशस्वी कारवाई मानली जात आहे.



