मुखेडमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा हातोडा! १३ हजारांची रोकड आणि ८ दुचाकी जप्त; ८ जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल

◽️सूतगिरणीच्या पाठीमागे रंगला होता डाव; मुखेड पोलिसांची मध्यरात्री धडक कारवाई!
मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १८ जून २६
तालुक्यातील अवैध धंद्यांविरुद्ध मुखेड पोलिसांनी अत्यंत कडक पाऊल उचलत एक मोठी कारवाई केली आहे. मुखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खरब खंडगाव येथे सुरू असलेल्या एका हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाडसी छापा टाकला. या धडक कारवाईत पोलिसांनी ८ जुगाऱ्यांना रंगेहात पकडत त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटना स्थळावरून जुगाराचे साहित्य, १३ हजारांची रोकड आणि तब्बल ५ लाख ३० हजार रुपये किमतीच्या ८ मोटारसायकली असाएकूण ५ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १६ जून २०२६ रोजी खरब खंडगाव येथील सूतगिरणीच्या पाठीमागे असलेल्या शेतातील मोकळ्या जागेत काही व्यक्ती विनापरवाना, बेकायदेशीररित्या जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती मुखेड पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी कसलाहीवेळ न घालवता पूर्ण तयारीनिशी घटनास्थळी धाड टाकली. पोलिसांनी अचानक वेढा घातल्याने जुगार खेळणाऱ्यांमध्ये एकच खळबळबळ उडाली.पोलिसांनी या छाप्यात जुगार खेळणाऱ्या १) दाजीराव बाबाराव कदम (वय ४५) २) आनंद गायकवाड(वय २२) ३) माधव नागोराव बेंद्रे (वय ५०) ४) शेख शब्बीर महबूब साहेब (वय ४५) ५) नबी हैदरसाबसय्यद (वय ४०) ६) बालासाहेब मियासाहेब शेख (वय ५०) ७) नागेश पवळे ८) इसाक रशीद सालुरेआरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे:
पोलिसांची कारवाई सुरू असतानाच, पोलिसांची चाहूल लागताच आरोपी नागेश पवळे (रा. गोणार)आणि इसाक रशीद सालुरे (रा. धामणगाव) हे दोघे अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळा वरून पसार झाले. पोलीस सध्या या दोन्ही फरार आरोपींचा कसून शोध घेत आहेत.
घटनास्थळा वरून पोलिसांनी पत्त्यांचे कॅट, जुगाराचे साहित्य, १३ हजार रुपयांची रोख रक्कम आणि आरोपींनी प्रवासासाठी वापरलेल्या ८ मोटारसायकली (किंमत रु. ५,३०,०००/-) जप्त केल्या आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अभिजित गणेश तातूरवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुखेड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनियमाच्या कलम १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास मुखेड पोलीस अत्यंत गांभीर्याने करीत आहेत. पोलिसांच्या या कडक कारवाईमुळे मुखेड तालुक्यातील अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
“तालुक्यातील अवैध व्यवसायांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. तालुक्यात कुठेही अवैध जुगार, सट्टा किंवा बेकायदेशीर धंदे सुरू असल्यास गय केली जाणार नाही. अशा बेकायदेशीर प्रकारांवर यापुढेही यापेक्षा अत्यंत कठोर कारवाई केली जाईल!”—: पोलीस उपनिरीक्षक अभिजित गणेश तुतूरवाड



