हिमायतनगरमध्ये ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत मोठी कारवाई; ११ लाख १५ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त!

हिमायतनगर प्रतिनिधी: श्रमिक एकता न्यूज़ १८ जून २६
नांदेड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन‘ अंतर्गत एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. या कारवाईत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधीत पानमसाला, जर्दा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली स्विफ्ट डिझायर कार असा एकूण ११ लाख १५ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन‘ अंतर्गत स्थानिकगुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांना आदेश दिले होते. या आदेशानुसार, पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे, त्यांचे पथक आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकारी अमृता दुधाटे हे हिमायतनगर परिसरामध्ये गस्त घालत होते.
गस्तीदरम्यान, हिमायतनगर येथील हजरत चौक (बेस्ट कॉलनी) भागात एका स्विफ्ट डिझायर कारमध्ये दोन इसम अवैध गुटखा भरून विक्रीसाठी थांबले असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबात अवगत करून पोलिसांनी तातडीने हजरत चौक परिसरात सापळा रचलाआणि संशयित कारला (क्रमांक एमएच ४८ एफ ०७०८ ) ताब्यात घेतले.
कारची तपासणी केली असता, त्यात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा, सुगंधीत पानमसाला आणि जर्दा आढळून आला. पोलिसांनी कारमधील दोन्ही व्यक्तींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे १) शेरखान मुसाखान पठाण (वय ३२ वर्षे, रा. संभाजीनगर, तामसा, ता. हदगाव, ह.मु. बेस्ट कॉलनी, हिमायतनगर)
२) शाहरुख खान मुसाखान पठाण (वय २८ वर्षे, रा. संभाजीनगर, तामसा, ता. हदगाव)
आरोपींकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी हा गुटखा ‘साई भैया’ (रा. मुधोळ) याच्याकडून खरेदीकेल्याची कबुली दिली. तसेच, उर्वरित गुटखा हिमायतनगर येथील त्यांच्या भाड्याच्या घरात लपवून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी तात्काळ त्या घरावर छापा मारून नायलोनच्या पोत्यात लपवलेला गुटखाजप्त केला. घरातून ४ लाख १५ हजार ६४० रुपयांचा तर कारसह एकूण ११,१५,६४० रुपयांचा मुद्देमालजप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १६७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता(BNS) च्या कलम १२३, २७४, २७५, ३(५) आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ च्या कलम२६, २७, २३, ३०(२)(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक (भोकर) मा. श्रीमती अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे, अन्न सुरक्षा अधिकारी अमृता दुधाटे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दारासिंग राठोड, पोलीस कॉन्स्टेबल आवाराव पिंगलवाड आणि लहू चाटे यांच्या पथकाने केली. या उत्कृष्ट कामगिरी बद्दल पोलीस अधीक्षकांनी संपूर्ण पथकाचे विशेष कौतुक केले आहे.



