मुखेड आयएमए शाखेला राज्यस्तरीय ‘बेस्ट स्मॉल ब्रँच’ पुरस्कार

▫️२६ वर्षांच्या वैद्यकीय व सामाजिक सेवेची राज्यस्तरावर दखल; डॉ. अशोक कौरवार यांच्या नेतृत्वाखालीऐतिहासिक यश
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड : २४ नोव्हेंबर २६
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) मुखेड शाखेने राज्यस्तरावर मानाचातुरा रोवला असून, शाखेला प्रतिष्ठेच्या ‘बेस्ट स्मॉल ब्रँच’ या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नागपूर येथे आयोजित एका भव्य सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे मुखेडच्या वैद्यकीय क्षेत्राचा राज्यभरात गौरव झाला आहे.
शाखेचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अशोक कौरवार यांच्या कुशल नेतृत्वाखाली मुखेड शाखेने वैद्यकीय सेवा, सामाजिक बांधिलकी आणि रुग्णहिताचे अनेक स्तुत्य उपक्रम राबवले आहेत. डॉ. कौरवार हे गेल्या २६ वर्षांपासून अविरत रुग्णसेवा करत असून, ग्रामीण व डोंगराळ भागातील गोरगरीब आणि गरजू रुग्णांना त्यांनी नेहमीच मदतीचा हात दिला आहे. अनेक रुग्णांना विनामूल्य वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देत त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे, याचीच दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला आहे.
नागपूर येथील या पुरस्कार वितरण सोहळ्यास राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कामगारमंत्री आकाश फुंडकर, आयएमएचे नियोजित राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयेश लेले, डॉ. संजय कदम, आमदार डॉ. तुषार राठोड आणि डॉ. संतोष कुलकर्णी यांच्यासह संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या नेत्रदीपक यशाबद्दल डॉ. अशोक कौरवार आणि मुखेड मधील सर्वच वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांचे सर्वस्तरांतून अभिनंदन व कौतुक होत आहे.



