आरोग्य

आरोग्यमंत्र्यांच्या ओएसडींच्या इशाऱ्याला वाटाण्याच्या अक्षता! मुखेड उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरच गायब; रुग्णांच्या नशिबी केवळ ‘३ रंगांच्या गोळ्या’

श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड: ०९ नोव्हेंबर २६

काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) डॉ. स्वप्नील सांगळे यांनी मुखेड उपजिल्हा रुग्णालयाची अचानक पाहणी करून अक्षरशः झाडाझडती घेतली होती. “येत्या १५ दिवसांत रुग्णालयाच्या कामकाजात ठोस सुधारणा न दिसल्यास, संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर निलंबनासह कठोर कारवाई करण्यात येईल,” असा सज्जड इशारा डॉ. सांगळे यांनी दिला होता. या पाहणी नंतर स्थानिक आमदार डॉ. तुषार राठोड यांच्या उपस्थितीत एक तातडीची बैठक घेण्यात आली होती, जिथे नागरिकांनी असुविधा आणि उपचारांमधील अडचणींचा पाढा वाचला होता. त्यावेळी डॉ. सांगळे यांनीवैद्यकीय अधीक्षक आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांच्या प्रशासकीय कामकाजाचा जाब विचारलाहोता.

पण या सगळ्या व्हीआयपी (VIP) दौऱ्यांचा आणि इशाऱ्यांचा रुग्णालयाच्या निर्ढावलेल्या प्रशासनावर कवडीमात्र परिणाम झालेला नाही.आज, दि. ०९ नोव्हेंबर रोजी रुग्णालयात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केलीअसता, परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याचे विदारक सत्य समोर आले आहे.

रुग्णालयात उपचारासाठी गेले असता अनेक महत्त्वाचे डॉक्टर अनुपस्थित असल्याचे उघड झाले आहे. रुग्णालयातील रक्तपेढी विभाग, वैद्यकीय अधीक्षक कक्ष, कार्यालयीन अधीक्षक कक्ष, सोनोग्राफी कक्ष, नेत्ररोग कक्ष, दंतरोग विभाग आणि सर्वसाधारण वैद्यकीय कक्ष (OPD) यांसारखे बहुतांश महत्त्वाचे विभाग ओस पडलेले किंवा बंद अवस्थेत पाहायला मिळाले.
सध्या बदलत्या वातावरणामुळे लहान मुले आजारी पडत आहेत, मात्र उपजिल्हा रुग्णालयात छोट्या मुलांच्या तापाची आणि सर्दी–खोकल्याची साधी औषधेही उपलब्ध नाहीत.

खासगी रुग्णालयांमध्ये ज्या प्रकारे रुग्णांची जवळून आणि काळजीपूर्वक तपासणी केली जाते, तशी कोणतीही तपासणी इथे केली जात नाही. डॉक्टर रुग्णांना हातही न लावता, दुर थांबूनच विचारपूस करतात आणि चिठ्ठीवर लिहून त्याच ‘३ कलरच्या गोळ्या‘ रुग्णांच्या हातात टेकवून मोकळे होतात.
आमदार आणि आरोग्यमंत्र्यांच्या ओएसडींनी एवढी मोठी झाडाझडती घेतल्यानंतरही जर उपजिल्हारुग्णालयाची अवस्था सुधारणार नसेल आणि सर्वसामान्यांच्या जीवाशी असाच खेळ सुरू राहणार असेल, तर गोरगरिबांनी न्याय मागायचा कुणाकडे? हा संतापजनक प्रश्न निर्माण झाला आहे. डॉ. सांगळे यांचातो निलंबनाचा सज्जड इशारा केवळ कागदावरच राहणार की आता खरोखरच या बेजबाबदारअधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार? याकडे आता संपूर्ण नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button