मुखेड उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर! १५ दिवसांत सुधारणा करा, अन्यथा निलंबनाची कारवाई:- ओएसडी डॉ. सांगळे

श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड: ०४ नोव्हेंबर २६
मुखेड उपजिल्हा रुग्णालयातील अनागोंदी कारभार आणि रुग्णांच्या होणाऱ्या गैरसोयीची अखेर आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली आहे. आरोग्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) डॉ. स्वप्नील सांगळे यांनी रुग्णालयाची अचानक पाहणी करून अक्षरशः झाडाझडती घेतली. रुग्णालयातील अस्वच्छता, बंद असलेला अतिदक्षता विभाग (ICU) आणि डॉक्टरांचे मुख्यालयात न राहणे, अशा अनेकगंभीर बाबींवर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “येत्या १५ दिवसांत रुग्णालयाच्या कामकाजात ठोस सुधारणा न दिसल्यास, संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर निलंबनासह कठोर कारवाई करण्यात येईल,” असा सज्जड इशारा डॉ. सांगळे यांनी दिला आहे.

तपासणीत नेमके काय आढळले?
अनेक वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपस्थित नसल्याचे आणि मुख्यालयात राहत नसल्याचे उघड झाले.
रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला अतिदक्षता विभाग बंद अवस्थेत आढळला.
रुग्णालयाच्या आवारात आणि वॉर्डमध्ये प्रचंड अस्वच्छता दिसून आली.
बाह्यरुग्ण विभाग (OPD) आणि बायोमेट्रिक हजेरी बाबत मोठ्या त्रुटी समोर आल्या.

रुग्णालयाबाबत सातत्याने प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेत ही धडक कारवाई करण्यात आली. यावेळी आरोग्य सेवा (मुंबई) संचालक डॉ. विजय कंदेवाड, लातूर मंडळाचे उपसंचालक डॉ. सतीशकुमार सोळंके, नांदेडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजभाऊ बुढे या वरिष्ठ अधिकाऱ्यांची फौजही उपस्थित होती.

या पाहणीनंतर स्थानिक आमदार डॉ. तुषार राठोड यांच्या उपस्थितीत एक तातडीची बैठक घेण्यातआली. या बैठकीत नागरिकांनी रुग्णालयातील असुविधा आणि उपचारांमधील अडचणींचा पाढा वाचला. डॉ. सांगळे यांनी वैद्यकीय अधीक्षक आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांच्या प्रशासकीय कामकाजाचा जाब विचारला.

दरम्यान, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी गरुडकर यांनी रुग्णालयाच्या आरोग्य व्यवस्थेतलवकरात लवकर सुधारणा करून नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिलीआहे. मात्र, १५ दिवसांचा कडक अल्टिमेटम दिल्याने आता रुग्णालयाचा कारभार खरोखरच सुधारणारका, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.



