गांजा तस्करांवर नांदेड पोलिसांची धडक कारवाई: मुखेड तालुक्यातून सव्वा किलो गांजासह एक अटकेत

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड : ०३ सप्टेंबर
नांदेड जिल्ह्यात अंमली पदार्थ तस्करांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत देगलूर उपविभागीय पोलीस पथकाने मध्यरात्री मोठी कारवाई करत मौजे उंद्री पं.दे (ता. मुखेड) येथे एका घरावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी १ किलो ११५ ग्रॅम वाळलेला गांजा (अंदाजे शासकीय किंमत₹२५,०००) आणि १२५ ग्रॅम वजनाचे गांजाचे जिवंत हिरवे रोपटे जप्त केले असून, बेकायदेशीररीत्या गांजा साठवून त्याची विक्री करणारा आरोपी सुधाकर संतुकराव वडजे (वय ३५ वर्षे, रा. उंद्री) याला बेड्या ठोकल्या आहेत. देगलूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण पोपळघट यांना मिळालेल्या पक्क्या गुप्त माहितीच्या आधारे, पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या निर्देशानुसार ३ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२:१५ च्या सुमारास अत्यंत पारदर्शक पद्धतीने शासकीय पंच, राजपत्रित अधिकारी व फोटोग्राफर यांच्या उपस्थितीत ही धाड टाकण्यात आली. घराच्या अंगणात झडती घेतली असता गांजाचे शेंडे, चुरा आणि मातीत लावलेले रोपटे आढळून आले. याप्रकरणी आरोपीवर मुखेड पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ (क), २०(२)(ब) अन्वये (गुन्हा क्र. ३१०/२०२६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धडक कारवाई अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर) आणि सुरज गुरव (नांदेड) यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी किरण पोपळघट, मुखेडचे पोनि. चिंताबर कामठेवाड, पोउपनि. अभिजीत तुतुरवाड, देगलूरचे पोउपनि. म्हैसनवाड यांच्यासह पोलीस अंमलदार रवींद्र भुले, अमोल सुंडगे, प्रवीण कुरे, विशाल आटकोरे, माधव मरगेवाड व महिला अंमलदार रिहाना शेख यांच्यापथकाने बजावली. जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री व साठवणूक करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असा सज्जड इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.



