भक्ती, उत्साह आणि जल्लोषाने गजबजले मुखेड … गणरायाला भावपूर्ण निरोप.

▫️शहरात ठिकठिकाणी महाप्रसादाचे आयोजन
▫️बंडे परिवाराची ३१ वर्षांपासून महाप्रसादाची परंपरा कायम
▫️पोलिस व प्रशासनाची चोख बंदोबस्त
मुखेड प्रतिनिधी: दि ०७ सप्टेंबर
आपल्या भक्तांनी मनोभावे केलेली सेवा व पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आमंत्रण स्वीकारून गणराय आपल्या गावी निघाले भक्तिभाव, उत्साह आणि आनंदमयी वातावरणानंतर गणेश भक्तांनी दि ०६ सप्टेंबर रोजी आपल्यालाडक्या गणरायाला अश्रुपूर्ण डोळ्यांनी निरोप दिला. “गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकरया…!” या घोषणांनी मुखेड शहर दुमदुमून गेले.

सकाळ पासूनच घरगुती तसेच सार्वजनिक मंडळांतून गणेशमूर्ती विसर्जनासाठी बाहेर पडू लागल्या. आकर्षक सजवलेले रथ, पारंपरिक वेशभूषेत व ढोल ताशांच्या गजरात मिरवणुका निघाल्या. महिलांनी फुगडी, तर लहानग्यांनी नृत्य करून मिरवणुकीत उत्साह आणला. संपूर्ण वातावरण “गणपती बाप्पामोरया“च्या गजराने भारून गेले होते.

विसर्जनावेळी भाविकांनी बाप्पाच्या चरणी दुर्वा, फुलं, नारळ वाहिला. अनेकांनी आरत्या करून कुटुंबाच्या आरोग्य, समृद्धी आणि सुखशांतीसाठी प्रार्थना केली. बाप्पाला निरोप देताना अनेकांच्या डोळ्यांत पाणी तर ओठांवर हास्य होते. कारण, हा निरोप तात्पुरता असून पुढील वर्षी पुन्हा आगमनहोणार याची खात्री होती. मुखेड नगरपालिका व प्रशासनाकडून विसर्जनासाठी जुना या गावच्या तलावघाटावर योग्य ती व्यवस्था करण्यात आली होती. नपाच्या तलावांमध्ये विसर्जनास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

३१ वर्षांपासून प्रसादाची परंपरा बंडे परिवार जपतो आहे. शिवकुमार शिवसांब बंडे, गजानन निळकंठराव बंडे, अशोक रामराव बंडे, सुरेश रामराव बंडे, केशव दिगंबर बंडे, गोविंद बाबुराव बंडे, शिवानंद शिवसांब बंडे या परिवारातील सदस्यांच्या पुढाकारातून दरवर्षी गणेशभक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली जाते ही परंपरा कै. नीळकंठ रामराव बंडे यांच्या प्रेरणेतून सुरू झाली असून आजही तिचे पालन श्रद्धा आणि उत्साहाने केले जाते

तहसीलदार राजेश जाधव व पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांनी सुद्धा मुखेडला भेट दिली. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष नियोजन केले गेले. भक्तिभावपूर्ण वातावरणात आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत गणरायाला निरोप दिला गेला




