सामाजिक

मुखेड तालुका ट्रिगर-१ मधून वगळल्याने बोरगावमध्ये शेतकऱ्यांचा संताप; शासन निर्णयाची (GR) केली होळी

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क बोरगाव ,मुखेड), दि. २७ सप्टेंबर २६

खरीप हंगामात पावसाचा प्रदीर्घ खंड आणि अवकाळी अतिवृष्टीमुळे मुखेड तालुक्यातील शेती पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. असे असतानाही राज्य सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या ‘ट्रिगर-१’ (Trigger-1) यादीतून मुखेड तालुक्याला वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पक्षपाती व अन्यायकारक निर्णयाच्या निषेधार्थ आज बोरगाव येथे संतप्त शेतकऱ्यांनी एकत्र येत राज्य सरकारचा जाहीर निषेध केला आणि संबंधित शासन निर्णयाची (GR) होळी केली.

नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यांपैकी तब्बल १४ तालुक्यांचा ट्रिगर-१ मध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र, अत्यंत बिकट परिस्थिती असतानाही केवळ मुखेड आणि मुदखेड या दोन तालुक्यांना यातून डावलण्यात आले. “प्रत्यक्षात या भागात दुष्काळापेक्षाही भयंकर वास्तव असून पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. प्रशासनाने केवळ तांत्रिक निकषांवर बोट न ठेवता वस्तुस्थितीचा विचार करावा आणि विशेष बाब म्हणून मुखेड तालुक्याचा समावेश तातडीने दुष्काळी सवलतींच्या यादीत करावा,” अशी एकमुखी मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली.

शासनाने तात्काळ मुखेड तालुक्याचा ट्रिगर-१ मध्ये समावेश करून शेतकऱ्यांना दिलासा न दिल्यास संपूर्ण तालुक्यात तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात बोरगाव परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button