दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार द्या; केजमध्ये शेकापचा तहसीलवर भव्य बैलगाडी मोर्चा

करपलेल्या पिकांची होळी करून शासनाचा निषेध; पीकविमा, वीजमाफी आणि चाऱ्याच्या प्रश्नावर प्रशासनाला धारेवर धरले
श्रमिक एकता न्यूज नेटवर्क केज/बीड :-
बीड जिल्ह्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या (शेकाप) वतीने सोमवारी केज तहसील कार्यालयावर भव्य बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. भाई मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात तालुक्यातील शेकडो शेतकरी बैलगाड्यांसह सहभागी झाले होते. पावसा अभावी खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले असताना सन २०२५ चा पीकविमा अद्याप मिळालेला नाही, यावरून संतापलेल्या शेतकऱ्यांनी तहसील आवारात करपलेल्या पिकांची होळी करून शासनाचा तीव्र निषेध नोंदवला.

यावेळी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात बीड जिल्ह्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, जनावरांसाठी चारा उपलब्ध करावा, प्रलंबित पीकविमा तातडीने खात्यावर वर्ग करावा, शेतीपंप व घरगुती वीज बिल पूर्ण माफ करून शेतीसाठी अखंड ८ तास वीज द्यावी, तसेच स्मार्ट मीटरची सक्ती बंद करून उसाचा दुसरा हप्ता त्वरित अदा करावा, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

या आंदोलनात शेकाप जिल्हा चिटणीस ॲड. नारायण गोले पाटील, भाई बापूसाहेब सोळुंके, भाई अशोक रोडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासनाने केवळ पोकळ आश्वासने न देता प्रत्यक्ष मदत द्यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.



